---Advertisement---
बक्सर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्त्येचा कट आखल्याच्या आरोपाखाली बिहारमध्ये तीन आरोपींना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. हे तिघेही अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’च्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.
बिहारमधील डुमराव उपविभागातील सिमरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशा पडरी गावात बुधवारी रात्री उशिरा छापा टाकून एका तरुणासह तीन जणांना अटक केली आहे.
चौकशीदरम्यान आरोपींकडून या संपूर्ण नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय संबंधांशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात. अमन कुमार, असे मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी परदेशात बसलेल्या संशयित लोकांशी संपर्क साधून केवळ गोपनीय माहिती शेअर करण्याबाबतच बोलणी केली नाही तर २२ दिवसांच्या आत पंतप्रधानांवर हल्ला करण्याची आणि सुरक्षेत घुसखोरी करण्याची योजनाही आखली होती.
या प्रकरणाची माहिती मिळताच बक्सरचे एसपी शुभम आर्य यांच्या निर्देशानुसार विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने तात्काळ कारवाई करत आशा पडरी गावात छापा टाकून तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या घरातून लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.
आरोपीचे घर केले सील
तपासात समोर आले की, आरोपींनी अमेरिके (सीआयए) च्या एजन्सीशी संबंधित लोकांशी संपर्क साधला होता. आरोप आहे की, त्यांनी पंतप्रधानांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुरक्षेत घुसखोरी करण्यासाठी आणि हल्ल्याच्या योजनेच्या बदल्यात पैशांची मागणी केली होती. मात्र, किती रक्कम मागितली होती, याबाबत पोलिसांनी स्पष्ट करण्यास नकार दिला आहे. एसपी शुभम आर्य यांनी सांगितले की, हे प्रकरण अत्यंत गोपनीय आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच याचा पूर्ण खुलासा केला जाईल.









