---Advertisement---
शहरातील स्टेट बँक मुख्य शाखेजवळील सावकारे बिल्डिंग परिसरात एका विवाहित महिलेच्या विनयभंगाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या दीराविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय महिला १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास जामनेर रोडवरील इमारतीत घरातील काही वस्तू आणण्यासाठी गेली होती. त्या वेळी इमारतीच्या जिन्याला कुलूप असल्याने तिने तेथे उपस्थित असलेल्या दीराकडे चावी मागितली. मात्र, त्याने चावी देण्यास नकार देत तिच्याशी वाद घातला, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने महिलेचा हात पकडून तिला जबरदस्तीने ओढत अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करत स्वतःची सुटका करून घेतली आणि तत्काळ ‘११२’ या आपत्कालीन नंबरवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून मयूर संजय कुमार सावकारे याच्याविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस पारिसकर करत आहेत.









