---Advertisement---
कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात खंडणीसाठी अपहरण करून एका व्यावसायिकाची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) असे आहे. अपहरणानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी रात्री उशिरा भरतेश घरी परतत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच नातेवाईकांना संपर्क साधत तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. आरोपींनी पैसे देण्यासाठी वारंवार ठिकाणे बदलत कुटुंबीयांची दिशाभूल केली. काही वेळानंतर फोन बंद झाला आणि त्यांच्याशी संपर्क तुटला.
दरम्यान, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. शेरी मळा परिसरात रस्त्यालगत उसाच्या शेताजवळ भरतेश यांच्या चपला आणि वाहन अढळून आले. यानंतर शोध अधिक तीव्र करण्यात आला असता, त्याच उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला. ही माहिती मिळताच गावात खळबळ उडाली.
संतप्त नागरिकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेत निषेध व्यक्त केला. सुरुवातीला बेपत्ता म्हणून नोंद घेतल्यामुळे पोलिसांबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची दिशा बदलत वेग वाढवला. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गुन्ह्याचा कट उघड झाला. या प्रकरणी टिल्लू पवार आणि राजदीप ताडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.









