---Advertisement---
अंदमान समुद्रात अलिकडेच मलेशियाच्या दिशेने जाणारी नौका उलटल्याने रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांसह किमान २५० लोक बेपत्ता झाले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित आणि स्थलांतर संस्थांनी दिली.
९ एप्रिल रोजी तीन रोहिंग्या आणि सहा बांगलादेशी नागरिकांसह नऊ जणांची सुटका करण्यात आली, असे बांगलादेश तटरक्षक दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर सब्बीर आलम सुझान यांनी बुधवारी वृत्तसंस्थेला सांगितले. नौका उलटल्यावर हे नऊ जण समुद्रात तरंगताना बांगलादेशचा ध्वज धारण करणाऱ्या एम. टी. मेघना प्राईड या जहाजावरील कर्मचाऱ्यांना आढळले. त्यानंतर त्यांनी या सर्वांची सुटका केली.
बोट बुडाली तेव्हा बुधवारी कोणत्याही शोधमोहिमेची स्थिती अस्पष्ट होती. बांगलादेशच्या दक्षिणेकडील कॉक्स बाजार जिल्ह्यातील टेकनाफ येथून मोठ्या संख्येने प्रवासी घेऊन जाणारा एक ट्रॉलर मलेशियाच्या दिशेने रवाना झाला, असे संयुक्त राष्ट्रांचे निर्वासित उच्चायुक्त आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
अतिगर्दी, सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र पामुळे जहाजावरील नियंत्रण सुटले आणि ते बुडाले, असे संबंधित संस्थांनी सांगितले. या संस्थेकडे इतर कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध नाही, असे कॉक्स बाजार येथील यूएनएचआरसीच्या संवाद अधिकारी शारी निजमन यांनी बुधवारी सांगितले. हा भीषण अपघात रोहिंग्यांचे दीर्घकालीन विस्थापन आणि शाश्वत उपापांचा अभाव दर्शवणारा असल्याचे यूएनएचसीआर आणि आयओएमने म्हटले आहे. म्यानमारमधून आलेल्या दहा लाखांपेक्षा जास्त रोहिंग्यांना आश्रय देणाऱ्या बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांना जीवनरक्षक मदत सुनिश्चित करण्यासाठी निधी आणि एकता अधिक मजबूत करावी, असे आवाहन यूएनएचसीआर आणि आयओएम यांनी केले आहे.









