---Advertisement---
मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात सापडलेल्या मादी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला चांगलीच धावपळ करावी लागली होती. अखेर सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कोणतीही घाई न करता, पुढील ४८ तास त्या बिबट्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात तिची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.
तपासणीत बिबट्याच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिची पचनक्रिया व्यवस्थित आहे का, याची खात्री करण्यासाठी तिला आहार देण्यात आला. निरीक्षणानंतर सर्व काही व्यवस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतरच तिला पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पिंजऱ्यातून वाहनाने सातपुड्याच्या जंगलात नेले. तेथे योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर पिंजरा सावधपणे उघडण्यात आला. समोर मोकळे जंगल दिसताच बिबट्या काही क्षण पिंजऱ्याच्या आतच थांबला. आसपासचा परिसर पाहून सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर तो बाहेर आला. वाहनाखालून उतरत त्याने जवळच्या मोबाइल टॉवरच्या ओट्यावर झेप घेतली आणि क्षणातच दाट जंगलात अदृश्य झाला.









