दिल्लीत लक्ष्यित हत्यांचा कट उधळला, आयएसआयच्या दोन हस्तकांना अटक

---Advertisement---

 

नवी दिल्ली : पाकिस्तानातील पाताळयंत्री गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशाऱ्यावर नाचणारा शहजाद भट्टीच्या दोन हस्तकांना दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली. या कारवाईच्या माध्यमातून दिल्ली-एनसीआर क्षेत्रात गोळीबार, ग्रेनेड हल्ले आणि लक्ष्यित हत्या घडवून आणण्याचा कट उधळण्यात आला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.

राजवीर आणि विवेक बंजारा, अशी अटक केलेल्यांची नावे असून, ते मूळचे मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरचे आहेत. या अटकेच्या माध्यमातून राष्ट्रीय राजधानी व सभोवतालीच्या परिसरात हल्ले करण्याचा कट उधळण्यात आला. या अटकसत्रातून भट्टीने रचलेला एक मोठा कट उघडकीस आला आहे.

भट्टी हा आयएसआय संबंधित इतर सूत्रधारांच्या साथीने समाज माध्यम मंचाद्वारे तरुणांची भरती करीत होता आणि त्यांना दिल्ली-एनसीआरमध्ये हिंसेच्या लक्ष्यित कृत्यांसाठी वापरत होता, असे पोलिस उपायुक्त (विशेष कक्ष) प्रवीणकुमार त्रिपाठी यांनी सांगितले.

या भागात ग्रेनेड हल्ले आणि लक्ष्यित हत्या घडवून आणण्याच्या योजनेबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे, ३१ मार्च रोजी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. विवेक बंजाराचा सर्वप्रथम शोध घेण्यात आला आणि १६ एप्रिल रोजी ग्वाल्हेरमध्ये डाब्रा येथून त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार राजवीर याच्याविषयी माहिती दिली. यामुळे १८ एप्रिल रोजी दिल्लीतील सराई काले खान परिसरातून त्याला अटक करणे शक्य झाले, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

नामांकित हॉटेल होते लक्ष्य

राजवीर हा त्याचा सूत्रधार शहजाद भट्टी याच्या निर्देशानुसार दिल्ली-एनसीआरमधील एका नामांकित हॉटेलला लक्ष्य करणार होता. त्याची तयारी करीत असतानात त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त कटाशी संबंधित असलेले तसेच गुन्ह्याचा पुरावा ठरू शकणारे व्हिडीओ आणि व्हॉईस नोट्स असलेले दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---