---Advertisement---
रांची : बंदुकीच्या जोरावर सशस्त्र क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या माओवादी संघटनेतील अनेक नेत्यांनी शरणागती पत्करल्याने त्यांच्या चळवळीला घरघर लागली आहे. संघटनेचा एकेकाळचा सर्वोच्च नेता देवजी याने शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याने बिथरलेल्या माओवाद्यांच्या झारखंडमधील तेलंगणातील उत्तर तालमेल कमेटीने (एनसीसी) पत्रक काढून आगपाखड केली. सशस्त्र क्रांतीचा पुनरुच्चार करत बसवराजू, हिडमाच्या मृत्यूचा सूड घेणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले.
कार्ल मार्क्स, लेनिन, चारु मुजुमदार, बसवराजू, राजू दा, कोसा दा आणि हिडमा या नेत्यांनी प्राणांची आहुती दिली पण कधी तडजोड केली नाही. मात्र, देवजीसारख्यांनी स्वतःच्या बचावासाठी शरणागती पत्करली, अशी बोचरी टीका संघटनेने पत्रकातून केली आहे. भूमिगत राहून लढा देण्याऐवजी कायदेशीर चौकटीत जाणे हा विघटनवाद असून, अशा लोकांमुळे क्रांतिकारी चळवळ कमकुवत होणार नाही आणि सशस्त्र क्रांती सुरूच राहणार असल्याचा दावा केंद्रीय कमिटीने केला आहे.
देशातील दोन राजकीय रेषांमधील संघर्ष अधोरेखित करत मार्क्स-लेनिन-माओ विचारसरणीवर आधारित सशस्त्र संघर्ष हाच योग्य मार्ग असल्याचा दावा पत्रकातून करण्यात आला. देवजी, कोबाड, वेणुगोपाल यांना शत्रूचा एजंट अशी उपमा देण्यात आली. देवजीने मांडलेली लोकशाहीची भूमिका त्यांना अमान्य असल्याचेही म्हटले आहे.
गनिमी कावा पद्धत अवलंबणार
सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसून गनिमी कावा आणि छापामार युद्धाद्वारे जनआंदोलन मजबूत करण्यात येणार आहे. नेपाळमधील कम्युनिस्ट चळवळ ज्याप्रमाणे मूळ वामपंथी विचारांपासून दूर गेली, तसाच प्रयत्न भारतातही सुरू असल्याचा संशय नक्षल्यांनी व्यक्त केला आहे. क्रांतीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या वाटेवर जाणे म्हणजे चळवळीचा घात असल्याचे पत्रात नमूद आहे.
सुरक्षा दल सतर्क
या पत्रकानंतर सुरक्षा दलाने माओवादग्रस्त भागात सुरक्षा वाढवली असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या तेलंगणा-छत्तीसगड सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढविण्यात आली आहे. माओवाद्यांच्या या धमकीवजा पत्रकाला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दल सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.









