भारतातूनच जगाला मिळणार धर्माची दिशा, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

---Advertisement---

 

नागपूर : प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत उभारलेले भव्य मंदिर हे केवळ स्थापत्य नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धा, संघर्ष आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक आहे. हे मंदिर प्रभू श्रीरामाच्या इच्छेनुसारच साकार झाले आहे. त्यामुळे भारतातूनच जगाला धर्माची दिशा मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

डॉ. हेडगेवार स्मारक समिती, नागपूरतर्फे अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार समारंभरेशीमबाग येथील स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज, महासचिव चंपत राय, डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष भय्याजी जोशी, उपाध्यक्ष श्रीधर गाडगे उपस्थित होते.

यावेळी डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी जसे प्रत्येकाने योगदान दिले, तशीच राममंदिर उभारणीत भारतातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे. मंदिर उभारण्यासाठी समाजाचे व्यापक आंदोलन, योग्य नेतृत्व आणि श्रद्धा यांचा संगम आवश्यक होता. राममंदिर हे त्या सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे. भारत हिंदू राष्ट्र आहे. हे घोषित करण्याची गरज नाही. जसा सूर्य पूर्वेकडून उगवतो, तसेच हे सत्यस्वरूप आहे. आज राममंदिर उभारणीमुळे संपूर्ण जगाने भारताची सांस्कृतिक शक्ती अनुभवली आहे. मात्र, मंदिर बांधणे हा शेवट नसून राष्ट्रमंदिर उभे करणे हे पुढील कार्य असल्याचे ते म्हणाले.

रामराज्य केवळ राजामुळे नव्हे, तर प्रजेच्या आचरणामुळे निर्माण होते, असे सांगताना त्यांनी, प्रत्येकाने प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्शाचे आचरण करण्याचे आवाहन केले. अनुकूलतेच्या काळात समाधान नव्हे, तर अधिक जागरूकता आवश्यक असल्याचेही सरसंघचालक म्हणाले.

चंपत राय यांनी मंदिर उभारणीतील अनेक अविस्मरणीय प्रसंग यावेळी सांगितले. मंदिर हजार वर्षे टिकावे या दृष्टीने त्यात लोखंड व सिमेंटचा वापर टाळण्यात आला असून, संपूर्ण देशातील तज्ज्ञ, कारागीर आणि समाजाच्या योगदानातून हे कार्य पूर्ण झाले, असे त्यांनी सांगितले.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, राममंदिराची उभारणी ही पूर्णविराम नसून रामराज्य स्थापनेच्या प्रवासातील अल्पविराम आहे. संघाच्या शताब्दीभराच्या संस्कार, संयम आणि समर्पणातून हे स्वप्न साकार झाले आहे. प्रास्ताविकात भय्याजी जोशी म्हणाले, अयोध्येतील राममंदिर हे हिंदू समाजाच्या पुनर्प्रतिष्ठेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अपमानाचा कलंक दूर झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला भगीरथ महाराज, तराणेकर महाराज, जितेंद्रनाथ महाराज यांच्यासह देशभरातील सुमारे २० संप्रदायांतील संत मंडळी उपस्थित होती. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार, राज्यसभा सदस्य माया इवनाते, सत्यनारायण नुवाल, बनवारीलाल पुरोहित, पराग सराफ, बनवारीलाल पुरोहित, धनंजय बापट, राजेंद्र पुरोहित, सुनील रायसोनी तसेच रा. स्व. संघाचे प्रांत व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

या मान्यवरांचा झाला सत्कार

राममंदिर निर्माण कार्यात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या देशभरातील ३० मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये नृपेंद्र मिश्र, गोविंददेव गिरी महाराज, चंपत राय, जगदीश आफळे, गिरीश सहसभोजनी, जगन्नाथ गुळवे, आशिष सोमपुरा, निखिल सोमपुरा, अरुण योगिराज, जय काकतीकर, मनीष त्रिपाठी, सत्यनारायण पांडे, अनिल सुतार, केशव शर्मा, विनोद शुक्ला, राजीव दुबे, मनीष दधीच, विनोद मेहता, अंकुर जैन, राजकुमार सिंह, ए. व्ही. एस. सूर्या श्रीनिवास, नरेश मालवीय, परेश सोमपुरा, नाथ अय्यर, संजय तिवारी, शरद बाबू, अनिल मिश्र, गोपाल जी, वासुदेव कामत, रमजान भाई यांचा सत्कारमूर्तीमध्ये समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---