टंचाईच्या झळा… अन् गावागावात तहानलेल्यांच्या किंकाळ्या संपणार कधी…!

---Advertisement---

 

जळगाव दिनांक विशेष: श्री. चंद्रशेखर जोशी (संपादक दै. तरुण भारत, जळगाव)

पाणी म्हणजे जीवन. पाणी म्हणजे सृष्टीचा श्वास, पण ज्या भूमीवर लहान मोठ्या नद्या दर पावसाळ्यात दुथडी भरून वहातात, अथांग भरलेली धरणे, बंधारे ओसंडतात त्या भूमीवरच आज घोटभर पाण्यासाठी लोकांना दाही दिशा फिरावे लागत असेल तर त्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? जळगाव जिल्ह्याचे आजचे चित्र काहीसे असेच विदारक आहे. दरवर्षी पावसाळ्यात तापी, गिरणा, वाधुर, सारख्या नद्या दुथडी भरून वहातानांचे दृष्य पहायला मिळते. या नद्यांवरील धरणे भरतात, प्रचंड जलसाठा साचतो. अथांग पाण्याचे दृश्य जणू समुद्रच अवतरत्याचे पहायला मिळते. अनेकदा पाण्याचा जोर एवढा असतो की धरणांचे दरवाजे उघडून प्रचंड पाणी साठा सोडावा लागतो व हे पाणी समुद्राकडे वाहून जाते. वाहते पाणी पाहून निसर्गाच्या उदारतेने मन सुखावते. मात्र काही दिवसांनंतर हाच जिल्हा पाण्याच्या थेंबा थेंबासाठी हतबल होऊन वणवण फिरत असल्याचे दृश्य दिसते.

आज तापी काठावरील भुसावळसारखे शहर, वरणगाव, धरणगावसह जिल्ह्यातील अनेक गावे पाणीटंचाईशी सामना करत आहेत. भुसावळकरांना तब्बल दहा दिवसांनी पाणी मिळते अन् तेदेखील अशुद्ध असल्याच्या तक्रारी आहेत. तेथील अमृत योजनेचे बारा वाजलेत पण कोणी बोलायला तयार नाही. ग्रामीण भागातील परिस्थिती तर यापेक्षा भयंकरच अनेक भागात विहिरींनी तळ गाठला आहे. हाथ पंपांनी साथ सोडली आहे, नळांना तर पाणी नाहीच. जेथे टँकरने पाणी पुरवठा होतो तेथे टैंकरची वाट पहाता-पहाता नागरिकांचे डोळे थकले आहेत. महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे, लहान मुला-मुर्तीच्या बागडण्याच्या दिवसांमध्ये छोटछोट्या कळश्या घेऊन ते पाण्यासाठी भटकंती करत असत्याचे दृश्य आमच्या ग्रामीण भागात दिसत असते. आज मोठ्या कष्टाने पाणी मिळाले प्रत्येकाच्या डोळ्यात उद्याच्या पाण्याची चिंता दिसत असते. तळपत्या उन्हाची चिंता न करता ही लहान मुले, महिला वृद्ध व्यक्ती पाण्यासाठी रांग लावून उभे असल्याचेही काही ठिकाणी पहायला मिळते. मग अशा वेळेस लोकप्रतिनिधी करत असलेल्या विकासांच्या दाव्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होते. परवा वरणगाव येथे पाण्यासाठी आंदोलन झाले. फैजपूरच्या पाणी आंदोलनात तर पालिका मुख्याधिकारी म्हणतात करा शुटिंग आम्हाला काहीही फरक पडत नाही. निर्लज्जपणाचा हा कळसच म्हणावा लागेल. पाण्यासाठी भटकंती करणाऱ्यांचा उद्रेक कमी करण्याचा प्रयत्न तर बाजुलाच पण असे निर्धावलेले वक्तव्य करणे म्हणजे आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही. याच भूमिकेत अधिकारी वर्ग असतो. बोदवड येथे पाणी पुरवठ्याचा अगदी नियोजन शून्य कारभार सुरू आहे. सांगितले जाते की १० ते १५ दिवस पाणी मिळाले नाही. येथे ओडिए स्किमने पाणी पुरवठा होतो. पाईप लाईन फुटल्याने एका ठिकाणी पाण्याचे डबके आहे. डबक्यातील हे पाणी घेण्यासाठी नागरिक धडपडत असतात, गर्दी करतात पण लोकप्रतिनिधींना त्याच्याशी घेणे-देणे नाही, किती ही शोकांतिका. तर दुसरीकडे आमचा बळीराजा आकाशाकडे नजर लावून बसलाय. नुकतीच सातपुडा पायथ्याशी असलेल्या केळी शेतीची वाट लागली. रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वारा व पावसामुळे कुन्हा व अंतुर्ली परिसरात शेकडो हेक्टर केळी पिक जमिनदोस्त झाले. शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला. यातच विमा कंपन्यांचा सासुरवास वेगळाच असतो. याप्रश्नी मुंबईत बैठक झाली. न्यायाची अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. पाहुया काय मदत दिली जाते ती…! खरीपात पावसाने पाठ दाखविल्याने नुकसान होते तर रब्बीत अवकाळीचा तडाखा ठरलेलाच… यावेळी नाही पुढत्यावेळी फायदा होईल असे स्वप्न बळीराजा पहात असतो. आताही त्याची आकाशाकडे नजर लागली आहे. काळे ढंग दिसले की मनात आशेचा किरण जागतो अन् ढग पुढे सरकले की पुन्हा निराशेचे सावट दाटते.

शेती कोमेजते, जनावरे तहानलेली आहेत आणि सध्याच्या उन्हाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील स्वप्नेही कोमेजून जात असल्याचे विदारक चित्र पहायले मिळते. पाणी टंचाई ही आजची समस्या नाही. ती नियोजनाच्या मर्यादांची, जलव्यवस्थापनातील त्रुटीची आणि गत काळात केलेल्या दुर्लक्षांची साक्ष म्हणावी लागेल, धरणे शंभर टक्के भरली की आम्ही आनंद व्यक्त करतो मग ते पाणी जाते कुठे? त्यासाठी नियोजन काय होते? प्रश्न फक्त आजच्या तहानेचा नाही पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा तो प्रश्न आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. जलसंधारण ही आजची गरज आहे. पण त्यासाठीचे नियोजन करण्याची वेळ हातून जात आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. उद्या नद्या वाहतांना पाहून मन आनंदून जाईल पण उन्हाळ्यात पाणी नाही म्हणून डोळे पाणावतील. या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक प्रश्न करतो की धरणे भरलेली असताना, नद्या वाहत असताना आज पाण्यासाठी ही दाही दिशा भटकंती कधी संपणार? या प्रश्नाचे उत्तर निसर्गाकडे नाही तर शासकीय व्यवस्थेच्या इच्छाशक्तीत आणि समाजाच्या सामूहिक जबाबदारीत दडलेली आहे. आजच्या या टंचाईवर मात करण्याची आता वेळ आली आहे. पाणी अडविले गेले पाहीजे अन्यथा पुढील उन्हाळ्यात तहानलेल्याची किंकाळी पुन्हा ऐकावी लागेलच लागेल, याबाबत संशय नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---