---Advertisement---
लंडन : दिवसेंदिवस हृदयविकाराचे रुग्णांमध्ये वाढ होते आहे. याला अनेक कारणे आहेत, मात्र त्यावर उपायही अनेक आहेत. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार गाऊटच्या म्हणजेच संधिवाताच्या औषधांमुळे हृदय विकाराचा धोका कमी हाते असल्याचे समोर आले आहे.
एक लाखांहून अधिक रुग्णांवर केलेल्या एका मोठ्या नवीन अभ्यासानुसार, गाउटवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी सामान्य औषधे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका देखील कमी करू शकतात. ज्या लोकांचा उपचार तितकासा प्रभावी नव्हता त्यांच्या तुलनेत, त्या गाउटग्रस्त लोकांनी योग्य मात्रेत युरेट-कमी करणारी औषधे घेतली त्यांच्यामध्ये पाच वर्षांच्या कालावधीत गंभीर हृदय विकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांमध्ये नऊ टक्के घट झाल्याचे नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले. गाउट हा दाहक संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि एकट्या अमेरिकेतच सुमारे एक कोटी लोकांना याचा त्रास होतो, तर जगभरात आणखी लाखो लोकांना याचा संसर्ग आहे. रक्तामध्ये युरिक अॅसिड जमा झाल्यामुळे हा आजार होतो. यामुळे सांध्यांभोवती सुईसारखे स्फटिक तयार होतात आणि ते वेदनादायी असतात. युरिक अॅसिडची उच्च पातळी किडनी स्टोनला (मूत्रपिंडातील खडे) देखील कारणीभूत ठरू शकते. हा अभ्यास ‘जामा इंटरनल मेडिसिन’ मध्ये प्रकाशित झाला आहे.
या अभ्यासात ज्यांनी अलीकडेच युरेट कमी करणारी औषधे घेणे सुरू केले आहे, अशा रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. ९९ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये ‘अॅलोप्यूरिनॉल’ या औषधाचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांनी, ज्या रुग्णांची युरिक अॅसिडची पातळी पहिल्या वर्षात सहा एमजी/डीएल या शिफारस केलेल्या मर्यादखाली आली. त्यांची तुलना हे लक्ष्य गाठू न शकलेल्या रुग्णांशी केली. गाउट असलेल्या लोकांना हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो. गाउटवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी ‘अॅलोप्यूरिनॉल’ सारखी औषधे योग्य मात्रेत घेतल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकतात, हे दर्शविणारा हा पहिलाच अभ्यास आहे. योग्य मात्रा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते आणि रक्तातील युरेटची पातळी ३६० मायक्रोमोल्स प्रति लिटर (६ मिग्रॅ /डीएल) पेक्षा कमी करण्यासाठी आवश्यक असलेली मात्रा म्हणजे योग्य मात्रा होय, असे स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक अभिषेक यांनी सांगितले.
युरिक अॅसिडची पातळी जितकी कमी असेल, तितकाच गाउटचा झटका कमी करण्यात आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करण्यात अधिक फायदा होतो, असे निकालांवरून दिसून आले. ज्या लोकांना आधीपासूनच हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका जास्त होता, त्यांना सर्वाधिक संरक्षण मिळाल्याचे दिसून आले.









