अमळनेरातील हळदीच्या कार्यक्रमात सायलेन्सरच्या आवाजावरून तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील तांदळी गावात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माहितीनुसार, संदीप हरचंद शिरसाठ (३८) यांच्या घरी ४ मे २०२६ रोजी रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू होता. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गावातील मयूर रघुनाथ पारवे हा बुलेट मोटारसायकलवर येऊन शिरसाठ यांच्या घरासमोर मोठ्या आवाजात सायलेन्सर वाजवू लागला. यामुळे त्रस्त झालेल्या शिरसाठ यांनी त्याला आवाज कमी करण्यास सांगितले.

यावरून संतापलेल्या मयूर पारवेने आपल्या वडिलांना आणि भावाला बोलावून घेतले. त्यानंतर रघुनाथ दगा पारवे, भूषण रघुनाथ पारवे आणि मयूर पारवे यांनी एकत्र येत शिरसाठ यांच्या घरात शिरकाव केला. तिघांनी शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. या झटापटीदरम्यान मयूर पारवेने लोखंडी काठीने मागून डोक्यावर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे शिरसाठ गंभीर जखमी झाले.

हल्ल्यानंतर आरोपींनी शिरसाठ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. जखमी शिरसाठ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५, ३५१(२), ३५२ आणि ३२४(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ तुकाराम पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---