---Advertisement---
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे समजते. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत दाखल झाले असून, सायंकाळी ५ वाजता राज्यसभा सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्या आपला राजीनामा सोपवण्याची शक्यता आहे. या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोणाला संधी देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. गेल्या वेळी राज्यसभा निवडणुकीदरम्यान छगन भुजबळ इच्छुक होते, मात्र त्यावेळी त्यांना डावलून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भुजबळांशिवाय इतर दोन नावांचीही पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे:
जय पवार: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना राज्यसभेवर पाठवून सक्रिय राजकारणात अधिक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तसे झाल्यास पार्थ पवार आणि जय पवार हे दोन्ही भाऊ सभागृहात एकत्र दिसू शकतात.
नितीनकाका पाटील: सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी नितीनकाका पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे पक्षाकडून हा शब्द पाळला जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना संधी मिळते की घराणेशाहीच्या टीकेला सामोरे जात जय पवारांना प्राधान्य दिले जाते, हे लवकरच स्पष्ट होईल.









