---Advertisement---
मुंबई : मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाला उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
रोजगारक्षम कौशल्यांना चालना देण्यासाठी मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना देखील मराठा समाजातील युवकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय विविध शैक्षणिक बाबींशी संबंधित शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.
ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक सवलती मिळतात, त्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही पात्रता प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी) पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमधील रिक्त राहिलेल्या जागांवर किंवा प्रवेश नियंत्रण समितीच्या मान्यतेने संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती लागू राहतील.
मराठा समाजाला लागू होणाऱ्या आठ सवलती
- दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ
- इयत्ता ९ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती
- मराठा युवकांसाठी मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
- विविध शैक्षणिक बाबींशी संबंधित शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत
- परराज्यातील अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही योजनांचा लाभ
- ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थ्यांनाही पात्रता
- सीएपी प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या किंवा संस्थास्तरावरील जागांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती
- भविष्यात ओबीसी प्रवर्गासाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती, योजना आणि सुविधा मराठा समाजालाही आपोआप लागू होतील.









