जळगाव : जुन्या वादातून सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३५, रा. राजमालतीनगर) यांचा २० नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुरत रेल्वेगेटजवळ खून झाला होता. गुरुवार, २८ रोजी मेहमूद बिस्मिल्ला पटेल (वय ४२) तसेच जानू उर्फ रेहान संजू पटेल (वय २०, रा. दोन्ही राजमालतीनगर) यांना शुक्रवार, २८ रोजी पोलिसांनी अटक केली. दोघांना शुक्रवार, २९ रोजी न्यायालयात पोलिसांनी हजर केले. युक्तिवादाअंती न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली.
या घटनेप्रकरणी विशाल अजय सुरवाडे (वय २८, रा. राजमालतीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासातून पोलिसांनी संजू बिसमिल्ला पटेल (वय ४७) तसेच जस्मिन उर्फ जास राजू पटेल (वय २७, दोन्ही रा. राजमालतीनगर, दूध फेडरेशन) या दोघांना २१ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. महेमूद बिस्मिल्ला पटेल (वय ४२) तसेच जानू उर्फ रेहान संजू पटेल (वय २०) या दोघांना २८ रोजी रात्री ८.२० वाजता पोलिसांनी अटक केली. महेमूद पटेल याच्या विरोधात यापूर्वी चार, तर जानू उर्फ रेहान पटेल याच्या विरोधात दोन गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
या संशयितांकडून दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी आज संशयितांना न्यायालयात हजर केले. तपासकामी पाच दिवसांची कोठडी पोलिसांनी मागितली. युक्तिवादाअंती न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले.