जळगाव : वाळूच्या अवैध चोरटी वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडून ते आणत असताना तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन पथकालाच माफियांनी लक्ष्य केले होते, अशी माहिती शुक्रवार, २९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून समोर आली. यापूर्वीही महसूल पथकांवर हल्ले झालेले आहेत. चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी यापुढे महसूल पथकांच्या सोबत महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (एमएसएफ) च्या मदतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे दिला असून प्रयाबाबत लवकर निर्णय होईल, असे संकेत मिळाले आहेत.
अवैध वाळू उत्खनन आणि चोरटी वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने अनेक पथकांची नियुक्ती केली आहे. गोपनीय माहिती मिळताच ही पथके दिवसा अथवा रात्री कारवाई करताहेत. गुरुवारी पहाटे तहसीलदार व तलाठी यांच्या पथकाने एक अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडले. या वाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयात आणत असताना वाळू माफियांनी तहसीलदार यांच्या वाहनाला धडक देत ते उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला होता. कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका पोहोचविण्याचा यामागे हेतू होता, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. चोरटी वाळू वाहतुकीला रोखण्यासाठी या पथकात शस्त्रधारी पोलीस यापुढे सहभागी करण्यात येतील. अशा पद्धतीची कारवाई पोलीस, आरटीओ हेही करू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली.
नागरिकांनी घर बांधताना तसेच अन्य प्रतिष्ठान यांनी नवीन बांधकाम करताना चोरीची वाळू विकत घेऊ नये. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. नागरिकांनी यासाठी सतर्कता घेतली पाहिजे. गुन्हेगारांवर कारवाई करावीच लागते आणि ही कारवाई यापुढेही सुरूच राहील. कारवाई अजिबात थांबणार नाही, असामाजिक तत्त्वांना थारा कुठेच मिळता कामा नये, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.