जळगाव दिनांक (चंद्रशेखर जोशी) : सोने आणि केळीची बाजारपेठ म्हणून जळगाव जिल्ह्याचा देशभरात लौकिक आहे. मात्र गत काळात घडलेल्या काही घटनांमुळे शहराची मोठी बदनामी झालीय आणि तीच परंपरा आजही सुरू असल्याचे लक्षात येते. अशा गोष्टींनी समाज मन खिन्न न झाले तर नवलच म्हणावे. जळगाव नगरपालिका ते आजची महापालिका या प्रवासात अनेक घटना धक्कादायक ठरल्या आहेत. मग ते घरकुत प्रकरण असो वा आजचे पाइप चोरी प्रकरण, चर्चा सर्वदूर सुरू आहे. मात्र त्यातील तपास कुणाच्या दबावाखाली होतोय हेच कळत नाहीये.
जळगाव पालिकेची स्थापना १८६४ मध्ये झाली. प्रारंभीच्या काळात अतिशय प्रामाणिक पदाधिकाऱ्यांच्या हाती सत्ता होती. फारसा राजकीय वारसा नसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हाती पालिकेची सतासूत्रे होती. काळ बदलला, व्यक्ती बदलल्या अन् त्यांची धोरणेही बदलली. तसतसे अनेक नवनवीन चेहरेही पालिकेच्या राजकारणात येऊ लागले. ज्यांची राजकारण म्हणजे उपजीविकेचे साधन, अशी धारणा होती किंवा आहे, असे अनेक नको ते चेहरे येथे उदयास आले. त्यामुळे तक्रार करण्याची हिंमतही कुणाला होत नव्हती. यातूनच ‘घरकुल’ घोटाळ्याचा उदय झाला.
पालिका काळातीत या काळ्या कृत्याचा भांडाफोड चर्वेच्या अनेक गुन्हाळानंतर मनपा कालखंडात झाला. तसे हे प्रकरण न. पा. कालखंडातील होते. १९९९ मधील ही योजना होती. त्यातील घोटाळा २००१ मध्ये उघडकीस आला. चौकशीअंती ११० कोर्टीच्या योजनेत ४५ कोटींचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. यात तत्कालीन मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांसह ४८ आजी माजी नगरसेवक दोषी ठरले होते, तर काहींना जेलमध्येही जावे लागले. राज्यभरातच नव्हे तर देशभरात हा घोटाळा गाजला.
मार्च २००३ मध्ये नगरपालिकेची महापालिका झाली आणि राजकारण्यांचा उत्साह वाढला. राजकीय पक्षांचा इंटरेस्टही वाढला. घरकुल घोटाळ्याची चर्चा महापालिकेच्या अनेक सभांमध्ये सुरू असायची त्यानंतरही अनेक प्रकार १७ मजलीत गाजते, जणू महापालिका म्हणजे अलीबाबाची गुहा व काम करणारे चाळीस चोर व ‘कासिम… असाच प्रत्यय वेळोवेळी येत गेलाय. शहरात महापालिकेच्या मालकीच्या काही मालमत्ता आहेत. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या काही वास्तू आहेत. त्यांचे जतन होतेय का? तर याचे उत्तर निश्चितच नकारात्मक द्यावे लागेल. १७ मजली म्हणजे आपल्या कमाईचे साधन, अशी भूमिका ठेवून वागणाऱ्यांची नजर या मालमत्तांवर असे. नुकताच घडलेला पाइप घोटाळा त्याचेच प्रत्यय आहे. गडगंज मालमत्ता व धनसंपदा असताना चोरी करण्याचे धाडस तत्कालीन विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी केले किती मजेशीर परिस्थिती आहे बघा.. पत्नी जयश्री महाजन तथा महापौर व त्यांचे पती विरोधी पक्षनेता… कोण कुणाला विरोध करणार…? है प्रकारच मग असे जुन्या पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइनची चोरी करण्याचे धारिष्ट्रच सुनील महाजनांनी केले.
कोट्यवधीची जमिनीतील पाइपलाइन चोरून नेत तिची भंगारात विक्री करणारी भंगार चोरांची ही गंगा अद्यापही गायब आहे. असे म्हणतात… सुनील महाजन नेमके कोठे आहेत हे पोलीस प्रशासनालाही माहिती आहे… पण त्याकडे दुर्लक्ष केले जातेय. भल्याभल्यांना पाणी पाजणारी पोलीस यंत्रणा नेमक्या आरोपीपर्यंत अद्याप का पोहचू शकली नाही? कोठेतरी पाणी मुरतेय है तेवढेच खरे… महापालिकेच्या मालमत्ता हुडकून त्यांची विक्री करायची आणि त्याचा थांगपत्ता लागू द्यायचा नाही… हे प्रकार धक्कादायक आहेत. सुनील महाजन यांचा गॉडफादर कोण?
शिवसेना उबाठा पक्षाकडून ही मंडळी महापालिकेत सत्तेत होती. सध्या या पक्षाच्या नेते मंडळींचे मौन हे सोयीनुसार आहे. तसे पाहिले तर पक्षात फारसे कोणी उरलेले नाही… सत्ताच नसल्याने सारेव सैरभैर झालेले दिसतात. त्यात आपल्याच माणसाने असे कृत्य केल्याने बोलणार काय? त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता जास्त बदनामीपेक्षा आरोपी गजाआड करणे व सद रक्षणाय… खल निग्रहणाय या ब्रिदाला आम्ही जपतोय यासाठी कारवाई गरजेची आहे. अगदी मोटारसायकल चोर पकडला तरी पोलीस अधिकारी मोठी कामगिरी केल्याचे दाखवत फोटो प्रसिद्धीस देतात. पत्रकार परिषदा घेतात… मग या प्रकरणातच मागे का? असा प्रश्न जनता विचारत असते… हे ‘अलीबाबा’ फार दूर नसावेत. आणि दूर जाण्याअगोदर त्यांच्यावर झडप घालावी व आपले कर्तृत्व सिद्ध करावे…
गत काळातील सत्तेत असलेल्या काही पक्षांच्या अनेक सदस्यांच्या स्थितीवर लक्ष देता त्यांची आजची परिस्थिती व मागील परिस्थिती (आर्थिक) यात जमीनअस्मानचा फरक आहे. १७ मजलीत पंधराव्या मजल्यावर सत्ताधाऱ्यांचे जास्त लक्ष असे अनेक वर्षांपासून दिसून येते. अनेक ठिकाणचे भूखंड गायब झाले… आरक्षणाचा खेळ खेळताना बरेच जण गबर झाले हे लपून नाही. पंधराव्या मजल्यावर कोणती फाईल आली, त्यात ताम कुणाचा होणार हे टप्पे ठरलेले आहेत. या सर्व गोष्टींना आळा बसणे गरजेचे आहे. अलीबाबा कोण?… कासिम कोण? अन् चाळीस चोर कोण? हे सुश जनता जाणते… त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा आहे ती पुढील कारवाईची….! अनेकांनी खुल जा सिम.. सिम… केले. ही मंडळी गर्भश्रीमंत झाली, पण कर भरणाऱ्या जनतेचा विचार आता होणे गरजेचे आहे.