---Advertisement---

एस.टी. भाडेवाढविरुद्ध शिवसेना (उबाठा) आक्रमक, राज्यभर चक्का जाम आंदोलन

by team
---Advertisement---

जळगाव : शहरात एस.टी. महामंडळाच्या भाडेवाढीविरोधात शिवसेना महानगर शाखेतर्फे चक्का जाम आंदोलन मंगळवारी करण्यात आले.  नवीन बसस्थानकात करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जळगाव सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. या आंदोलनामुळे बस स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी एस.टी. बसच्या रांगा लागल्या, यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन मोठा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांनी भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी महानगर प्रमुख शरद तायडे, भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, प्रशांत सुरडकर, पियुष गांधी, नीता सांगोळे, किरण भावसार, मनिषा पाटील, गायत्री सोनवणे, गणेश सोनवणे, शोएब खाटीक, निलेश ठाकरे, विजय बांदल, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, हर्षल मुंडे, राधे बाविस्कर आणि इतर अनेक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस.टी. महामंडळाने नुकतीच भाडेवाढ जाहीर केली, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक ताण वाढला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी एस.टी. हे प्रवासाचे प्रमुख साधन आहे. भाडेवाढीमुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी भर पडत असल्याने शिवसेनेने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आणि भाडेवाढ मागे घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

हेही वाचा : मित्रासोबत बेडरूममधे होती अन् वडील आले… जानव्ही कपूरने सांगितला ‘तो’ किस्सा

आंदोलनानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जळगाव एस.टी. डेपोचे व्यवस्थापक संदीप पाटील यांची भेट घेतली. त्यांनी भाडेवाढीच्या विरोधातील निवेदन त्यांना सादर केले आणि महामंडळाकडे प्रवाशांच्या मागण्या पोहोचवण्याचे आवाहन केले.

गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, “सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांच्या खिशावर दडपण आणण्याचे धोरण स्वीकारले आहे. शिवसेना प्रवाशांच्या हक्कांसाठी नेहमीच लढा देईल.” एस.टी. महामंडळ हे राज्यभरातील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी एस.टी.ची सेवा अपरिहार्य आहे. त्यामुळे भाडेवाढीमुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करणे महत्त्वाचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी नमूद केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment