वॉशिंग्टन डी.सी. : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. नुकतेच तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची बुधवारी (१२ फेब्रुवारी) भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी तुलसी यांचं अभिनंदन केलं आणि भारत-अमेरिका संबंधांबद्दल चर्चा केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तुलसी यांच्याकडे १८ गुप्तचर यंत्रणांची जबाबदारी सोपवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड (Tulsi Gabbard) यांची भेट घेतली आहे. दहशतवाद आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी दोन्ही देशांमधील संवाद अधिक सुलभ कसा करता येईल, यासंदर्भात यावेळी द्विपक्षीय चर्चा झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर तुलसी गॅबार्ड यांच्यासोबत झालेल्या भेटीविषयी माहिती देत पोस्ट केली आहे. तुलसी गॅबार्ड यांचे यावेळी गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोदींनी अभिनंदन केले आहे. तसेच, दोन्ही देशांमधील मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत कशी करता येईल, यावर चर्चा झाल्याचे मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.