मुंबई : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपशब्द वापरत केलेल्या वक्तव्यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विधानानंतर शिवसेनेकडून संजय राऊतांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी उबाठा गटातील व्यवस्थेबाबत एक विधान केले होते. उबाठा गटात दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की, एक पद मिळत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. यावरून संजय राऊत चांगलचे संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी नीलम गोऱ्हेंबाबत खालच्या शब्दात टीका केली.
तसेच नीलम गोऱ्हे यांनी ५० लाख रुपये देऊन हा कार्यक्रम लावला. तसेच लक्षवेधी लावायलादेखील त्या पैसे घेतात, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होत असून राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांकडून तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच नीलम गोऱ्हेदेखील दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देणार असल्याची माहिती आहे.