इराक आणि सीरियामध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अब्दुल्लाह माकी मुसलेह अल-रिफाई उर्फ अबू खादीजा हा इराकी आणि अमेरिकन सैन्याच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराकी पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी शुक्रवारी (१४ मार्च २०२५) ट्विटरवर या कारवाईची माहिती दिली.
अल-सुदानी यांनी सांगितले की, इराकी राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेच्या सैन्यासोबत समन्वय साधत ही मोठी मोहीम पार पाडली. या कारवाईमुळे इराक आणि सीरियामधील दहशतवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.
अबू खादीजा कसा मारला गेला ?
ही कारवाई इराकच्या अनबार प्रांतात झाली. इराकी गुप्तचर संस्था आणि अमेरिकन युती दलांनी संयुक्तपणे हवाई हल्ले केले. अबू खादीजा हा आयएसचा उपखलीफा होता, जो इराक आणि सीरियामध्ये संघटनेचा प्रमुख होता. तो इराक आणि जागतिक सुरक्षेसाठी सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जात असे.
अबू खादीजा कोण होता?
अबू खादीजा हा इस्लामिक स्टेटच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रिया समितीचा प्रमुख आणि गटाच्या जागतिक ऑपरेशन्सचा प्रमुख होता. त्याच्या कार्याची मुख्य जबाबदारी म्हणजे, इस्लामिक स्टेटच्या जागतिक दहशतवादी कारवायांचे नियोजन, आर्थिक रसद आणि निधी व्यवस्थापन, नवीन दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षण, अशी होती.
इस्लामिक स्टेटमध्ये तो दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नेता मानला जात होता, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर या संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.