---Advertisement---

अमळनेरातील अनैतिक कृत्यांचे ‘पंजाब कनेक्शन’! युवतीच्या अपहरणानंतर खळबळ, अनेक प्रकार येताय समोर

by team
---Advertisement---

अमळनेर : गेल्या आठवड्यात अमळनेर येथील तांबेपुरा भागातून एका युवतीस फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याप्रश्नी पोलीस प्रशासन फारसे गंभीर नसल्याचेच लक्षात येत आहे. वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमळनेर शहरातील तांबेपुरा हा भाग नेहमी काही ना काही घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. गेल्या वर्षी येथून निघालेला मुस्लीम समाजाचा जुलूस धक्कादायक ठरता होता. हिरवे झेंडे फडकावत काही जणांनी दगडफेकीचे प्रकार केले होते. हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्या वेळी या समाजातील काही जणांना राजकीय अभय मिळाले. त्यानंतर युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून न्यायचे व नंतर त्या कोठे गेल्या याचा पत्ताच लागत नसल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत.

१४ मुली झाल्या गायव

गेल्या काही कालखंडात येथील १४ मुली गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीना फसवून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांना अन्य ठिकाणी नेले गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. तांबेपुरा येथून गेल्या १३ तारखेला एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणी गायब झाल्याने या भागात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासानुसार या मुलीला पंजाबात नेले गेले असावे, या अंदाजावरून पोलिसांचे एक पथक पंजाबला जाऊन आले. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही.

पंजाब कनेक्शनची चर्चा

तांबेपुरा भागात रहाणाऱ्या एका महिलेकडे संशयाची सुई जात आहे. व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करणाऱ्या या महिलेचा शहरात मोठा दरारा तेवढाच रुबाब असल्याचे सांगितले जाते. युवतीला गायब करण्यात या महिलेचा हात असावा, असा संशयही व्यक्त केला जात असून तिचे मूळ पंजाबात असल्याचे समजते. त्यामुळेच पोलीस पथक तेथे गेले. मात्र महिलेचे हात पोहोचलेले असल्यामुळे सर्व माहिती बाहेर गेली असावी व त्या युवतीस तेथून गायब केले गेल्याचे बोलले जात आहे.

अवैध धंदे जोरात

अमळनेरात काही भागात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागातून अवैध पिस्टल येत असल्याचेही पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. त्यातूनच काही हल्ल्याचे प्रकार घडत असतात तसेच पंजाबातून आलेली व्यक्ती काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून अवैध सावकारी करते व तिची या भागात २० ते २२ घरे असणे या प्रकाराकडे दुर्लक्षच होत असल्याच्या तक्रारी असून शहरात यामुळे दहशतीचे व भीतीचे वातावरण आहे.

खासदारांकडून गंभीर दखल

खासदार स्मिता वाघ यांनी याप्रश्नी पोलीस प्रशासनाशी चर्चा केली. तांबेपुरा भागातील अवैध सावकारीचा विषय शहरात चर्चिला जात आहे. सदर महिलेने याच व्यवसायातून २० ते २२ घरे कशी घेतली? यासह अन्य काही माहिती प्रशासनाला देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. शहर परिसरातून तब्बल १४ मुली गायब होणे व त्यांचा नंतर पत्ताच न लागणे हा विषय गांभीर्याने घ्यावा अशा सूचना खासदारांनी केल्या आहेत.

पोलीस प्रशासनास आपण काही सूचना केल्या आहेत. अशा पद्धतीने कोणी अनैतिक व्यवसाय करत असेल तर कडक कारवाई केली जावी, असेही सांगितले आहे. काही प्रकारांकडे दुर्लक्ष होते, त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतात.
स्मिता वाघ, खासदार, जळगाव लोकसभा मतदारसंघ

या घटनेची दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे. त्या ठिकाणी काही तोडफोडीचे प्रकार झाले. कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. पोलीस तपास सुरू आहे.
डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव.

व्हाट्सऍप्स ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment