अमळनेर : तालुक्यातील सात्री गावात लागलेल्या अचानक आगीमुळे सात ते आठ घरे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या भीषण आगीमुळे संपूर्ण गाव हादरले आहे.
सात्री गावात बुधवारी (दि . २ ) रात्री एका खळ्याला अचानक आग लागली. या खळ्याच्या शेजारी असलेल्या एका घरात चार ते पाच गॅस सिलिंडर होते. आग या घरापर्यंत पोहचताच घरातील सिलिंडरचा एकापाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाला. चार ते पाच गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने गावात भीषण आग लागली.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळाकडे रवाना झाली. या गावाला जाण्यासाठी तापी नदीतूनच रस्ता आहे. अमळनेरहून निघालेले अग्निशमन दलाचे वाहन या नदीपात्रातील वाळूत रुतले. शेवटी जेसीबीच्या साहाय्याने हि वाहने बाहेर काढण्यात आली,त्यानंतर ते सात्री गावात पोहचले. काही वेळाने धरणगाव, चोपडा, पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी घटनेचा आढावा घेतला आहे.