---Advertisement---

Jalgaon News : सिमेंटच्या रस्त्यावर दुरुस्तीला डांबर प्रशासनाच्या चातुर्याचा पहिला नंबर

---Advertisement---

राहुल शिरसाळे
जळगाव :
जिल्ह्याचं शहर असलेलं जळगाव. या शहरातला मी एक रस्ता. माझी व्यथा-कथा ऐका. तसा आता आपणास मी रोजच भेटणार आहे. वेगवेगळ्या परिसरातील रस्त्यांच्या कहाण्या मांडणार आहे.

गत काळात शहराच्या रस्त्यांच्या समस्यांचा खूप गवगवा झाला. त्यांची अवस्था, नव्हे; नव्हे; दैनावस्था म्हणू या. जागोजागी खड्डे. अगदी चाळण झालेले रस्ते. मग या रस्त्यांची प्रशासनाला दया आली. सरकारचा वरदहस्त लाभला. निधीही मंजूर झाला. रस्ते सिमेंटचे होऊ लागले. लोकांना कोण आनंद झाला. गाड्या भन्नाट वेगात धावू लागल्या. पण… पण, हा आनंद फार काळ टिकला नाही… कारणही तसेच. बोलता येत नाही, सांगता येत नाही… अशी जनतेची कारुण्य अवस्था. तर आता नेमक्या रस्त्यावर बोलू या.

शहराचा अति वर्दळीचा रस्ता. नेरी नाका ते अजिंठा चौफुली. कामगार, शेतकरी, बाहेर गावातील नागरिक, संभाजी नगरकडे जाणारी सर्व वाहने या रस्त्याचे आश्रित. लाभधारक, या रस्त्याचे वर्ष-दीड वर्षापूर्वीच काँक्रीटीकरण झालेले. मात्र, या रस्त्याची सध्या खूपच दुर्दशा झालीय. काही नागरिक बोलतात. काही स्पष्ट बोलत नाही. पण सारं उघड्या डोळ्यांनी दिसतं. ते झाकलं जात नाही. काही लोकांची ओरड सुरूच आहे. पण दखल घेतली जाईल का? हा महत्त्वाचा प्रश्न.

सिमेंट काँक्रीटचा हा रस्ता. मात्र गुळगुळीत करण्यात आलेला नाही. यामुळे वाहने उदळतात. बाऊंस होत मार्गक्रमण करतात. आपण घोड्यावर ड्यावर आहोत की गाडीवर? असा प्रश्न पडावा. या रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच वाहने हाकावी लागतात. छोटे-मोठे अपघात येथे नित्याची बाब झाली आहे. या रस्त्यामध्ये जागोजागी खड्डेचखड्डे झाले आहेत.

आता विशेष हे की, एस.टी. वर्कशॉपजवळ एका ठिकाणी तर चक्क डांबर टाकण्यात आले आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची दुरुस्ती चक्क डांबर टाकून..? केवढा दैवदुर्विलास ? सुज्ञ, डोळस नागरिकांना हे दिसते. कळते. पण वळत नाही. बोलत नाहीत. मी रस्ता… हो रस्ताच, तरीही बोलतोय. तुमचे माझे दुःख व्यक्त करतोय. असं का होतं? हे योग्य की, अयोग्य? याचा सारासार विचार कुणीतरी करेल का? हा जनसामान्यांत चर्चिला जाणारा प्रश्न.

वाहनं धावतात. लोक चालतात. चतुष्पाद प्राणीही ये-जा करतात. पण मी रस्ता… सोसतोय दुःख. रस्ता अबोल असतो. त्याला कुठे भावना असतात? तो काय करेल? जिथं जितीजागती माणसं काही बोलत नाहीत. तिथे माझा काय पाड? वर्ष-दीड वर्षापूर्वी तयार झालेल्या रस्त्याची अशी शोकांतिका असेल, तर धन्य तुम्ही आणि तुमचं गाव, शहर आणि प्रशासन. पण या रस्त्यावर दोन्ही बाजूला स्पीडब्रेकर टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. हेही नसे थोडके. असो. भेटू पुन्हा.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment