Jalgaon News : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक होत्या. निवडणूक कालावधी वगळता जिल्ह्यात नवमतदार नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघात तब्बल ३७ हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. यात १८ वर्षे वयोमयदिनुसार मतदानाचा हक्क मिळणारे नवमतदार आणि नवीनच विवाह होऊन सासरी आलेल्या महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.
राज्य विधानसभा निवडणूक २०२४ नंतर जिल्हा तसेच तालुकास्तरावरील निवडणूक शाखेअंतर्गत अव्याहतपणे नवमतदारांकडून नोंदणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात डिसेंबर ते आतापर्यंत गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३७ हजार ६४२ मतदार वाढले आहेत. या नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना आगामी महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघात ३६ लाख ७८ हजार ११२ मतदार संख्या होती. दोन दिवसापूर्वीच ३ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्ह्यात ३७ लाख १५ हजार ७५४ अशी एकूण मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ३७ हजार ६४२ नवमतदारांच्या संख्येत भर पडली असल्याचे दिसून आले आहे.
मतदार नोंदणी प्रक्रिया सुलभ असून, घरबसल्या मोबाइल अॅपवरूनही करता येते. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचा मतदार नोंदणी प्रक्रियेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर ते आतापर्यंत सद्यःस्थितीत पाच महिन्यांतच ३७ हजारांवर मतदारसंख्येत वाढ झाली आहे.
अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा