Jalgaon News : राज्यात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान अपात्र लोकांनी बनावट जन्मदाखले मिळविल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशीत राज्यभरात १७ ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्यात जळगावमध्ये ४३ आणि भुसावळमध्ये एक हजार अर्ज दाखल आहेत. जिल्ह्यात इतरत्रही असे प्रकार असण्याची शक्यता असल्याने, सर्वंकष चौकशीची गरज आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (८ एप्रिल) व्यक्त केले.
जळगावात बोगस व बनावट स्वाक्षरीने खोटे जन्मदाखले घेतले गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, या पार्श्वभूमीवर सोमय्या हे दुपारी साडेतीनला शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत तब्बल तासभर बंदद्वार गंभीर प्रकरणाबद्दल डॉ. रेड्डी यांच्याशी चर्चा केली. जळगाव येथे महापालिकेत तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचा नमुना सादर करून ४३ जणांनी जन्मदाखले घेतले.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे आज जळगाव येथे आले. त्यांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. तब्बल एक तास बंद कॅबिनमध्ये त्यांनी या गंभीर प्रकरणाबद्दल डॉ. रेड्डी यांच्याशी चर्चा केली. या वेळी भाजपचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. ही चर्चा आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मध्ये २०२४ आचारसंहितादरम्यान दोन लाख २३ हजार लोकांचे अर्ज जन्म दाखल्यांसाठी राज्यातील विविध ठिकाणी प्राप्त झाले. या अनेक अपात्र लोकांनी जन्मदाखले प्राप्त केले. यामध्ये २५ ते ६५ वयोगटातील लोकांचा समावेश असून बनावट दाखले घेणारे बांगलादेशी असून, याप्रकरणी सर्वंकष चौकशी करण्याची गरज आहे, असे किरीट सोमय्या यांनी नमूद केले.
एटीएस, एमआयएकडून चौकशी
भारत सरकारच्या गृह विभागाचे बोगस जन्म दाखले प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. केंद्राच्या एटीएस आणि एमआयए या एजन्सींशी मी याविषयी चर्चा करून त्यांना राज्यातील या बनावट प्रकरणाची माहिती दिली. योग्य वेळी या एजन्सी चौकशीत प्रत्यक्ष सहभागी होतील. बोगस जन्म दाखले संदर्भात केंद्रीय गृह खात्याने राज्य शासनाकडून अहवालही मागविला आहे. असे ते म्हणाले.
जन्माचे बनावट पुरावे दिले
भारतात जन्मले, तर त्याची नोंद होते. मात्र या लोकांनी ते कागदपत्रं दाखला घेण्यासाठी ते सादर केले नाहीत. म्हणजे ते त्यांच्याकडे नव्हतेच. देशातील रहिवासी असत्याचे कागदपत्रं न देता त्यांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. तो कशासाठी? मग ते नेमके मूळ कोठले? हे प्रश्न उपस्थित होतात. याच्या चौकशीची गरज आहे, असेही सोमय्या म्हणाले.
मालेगावात बोगस दाखला
२०२० मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात मालेगाव येथे पोलिसांनी सोमवारी (७ एप्रिल) एकाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच्याकडे बोगस दाखला असल्याचा मामला उघडकीस आला. त्यामुळे या बनावट दाखल्यांची व्याप्ती मोठी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
भारत सरकार एजन्सीकडून चौकशी
भुसावळ येथे एक हजार अर्ज दाखल आहेत. जन्म दाखले घेणारे बांगलादेशीच आहेत, असा दावा माजी खासदार, ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (८ एप्रिल) जळगाव येथे केला. या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी भारत सरकारची एजन्सी राज्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
पोलिसांचा तपास कौतुकास्पद
जळगाव शहरात ४३ बनावट दाखल्यांचे प्रकरण उघडकीस आले. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी जलदगतीने तपासाला चालना दिली. मनपा, जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या समन्वयातून बोगस दाखल्यांचा फ्रॉड पकडला गेला. दोन वकिलांना अटक केली. या फसवणूक प्रकरणामागे कोण आहे? हे तपासातून समोर येईलच. पोलिसांची ही मोठी उपलब्धी आहे, असे सांगून सोमय्या यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करीत जिल्ह्यात अन्यत्रही या संशयास्पद प्रकारांच्या सखोल चौकशीची गरज असल्याचे मत व्यक्त केले.