Jalgaon News: शहरात बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोर्ट चौक ते महाराष्ट्र बँकेच्या दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस दलातर्फे मॉक ड्रील घेण्यात आली. पोलिसांची ही मॉक ड्रील सर्वसामान्यांना चांगलीच महागात पडली. मॉक ड्रील दरम्यान, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्याने नागरिकांना अचानक डोळे जळजळणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. अचानक हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. आ. राजूमामा भोळे यांनी माहिती मिळताच, महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
याबाबत माहिती अशी की, आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमींवर पोलीस प्रशासनातर्फे पोलीस मैदानावर मॉक ड्रील घेण्यात येत होती. दरम्यान, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याने याच वेळेस सरकारी कार्यालये सुटतात. तर काही विद्यालयेदेखील याच वेळी सुटतात. या नळकांड्या फुटल्याने शिवतीर्थ मैदान ते स्टेडियम परिसरात नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होऊ लागली. हा त्रास नेमका कशामुळे होतो आहे, हे सुरुवातीला कोणालाच लक्षात आले नाही.
हा प्रकार लक्षात येताच सुज्ञ नागरिकांनी आमदार सुरेश भोळे, अग्निमशमन विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या. तक्रार लक्षात येताच अग्निमशन अधीक्षक शशिकांत बारी हे अग्निशमन दलासह स्टेडीयम परिसरात दाखल झाले. काहींनी स्टेडीयममधील स्विमिंगपूलमधील क्लोरीनचा वास असावा, अशी शंका व्यक्त केली. या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्टेडीयममधील स्विमिंगपुलाची पाहणी केली, परंतु, त्यात लिकेज आढळले नाही. दरम्यान, पोलीस ग्राऊंड येथे मॉक ड्रील सुरू असल्याचे लक्षात आले. या मॉक ड्रील दरम्यान, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
प्रशासनातर्फे रस्ता बंद
या अपघातामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता खबरादारी म्हणून
मात्र घटनेची माहिती मिळताच काही काळ मनपा प्रशासनाकडून स्टेडीयम ते कोर्ट चौकाचा रस्ता बंद करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी आ. राजूमामा भोळे यांनी भेट दिली. त्यांनी महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
मॉक ड्रील दरम्यान अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या
14 एप्रिलच्या अनुषंगाने मॉक ड्रील घेण्यात आली. पोलीस कवायत मैदानावर मॉक ड्रील सुरू असताना, अश्रुधुराच्या चार ते पाच नळकांड्या फोडण्यात आल्या. हवा आल्याने अश्रुधूर स्टेडीयम परिसरात पसरला. यामुळे नागरिकांना डोळ्यात जळजळ आणि घशात आणि नाक्यात खवखवल्याची समस्या निर्माण झाली. असे असले तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, या अश्रुधुरामुळे दोन ते तीन मिनिटे डोळ्यात जळजळ होते. डोळ्यांना मोठ्या प्रमाणात इजा होईल, असा प्रकार होत नाही, असे रामेश्वर सोळुंखे, (आरएसएस), पोलीस मुख्यालय, जळगाव, यांनी सांगितले.
थंड पाण्याने डोळे स्वच्छ करण्याचे आवाहन
मॉकड्रीलमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे हा वायू हवेमुळे परिसरात पसरला. यामुळे नागरिकांना डोळ्यात जळजळ होणे, चक्कर येणे अशा स्वरूपाचा त्रास झाला. यावर नागरिकांनी डोळे चोळू नये, थंड पाण्याने डोळे स्वच्छ करावे. तरीदेखील त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले आहे.