जळगाव : कौटुंबिक छळ प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तडजोडीअंती २० हजारांची लाच मागून ती जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वीकारणाऱ्या दोन हवालदारांना जळगाव एसीबीने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली.
या कारवाईने जळगाव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार (४७) व हवालदार धनराज निकुंभ (४५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता १४ पर्यंत पोलीस कोठडीसुनावण्यात आली.
सैनिकाकडून स्वीकारली लाच
४२ वर्षीय तक्रारदार हे केंद्रीय अर्ध सैनिक बलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कौटुंबिक कारणावरून पत्नीशी भांडण झाल्यानंतर पत्नीने तक्रारदाराविरोधात ४ फेब्रुवारी २०२५ रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या चौकशी कामी आरोपी हवालदार रवींद्र सोनारने तक्रारदाराला चौकशीकामी पोलीस ठाण्यात बोलावले होते. या वेळी धनराज निकुंभसोबत भेट घालण्यात आली व कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, योग्य ती मदत करण्यासाठी तसेच त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी निकुंभ याने ५० हजारांची लाच मागितली होती.
काम करीत असलेल्या पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा
निकुंभ याने लाच देण्यासाठी सातत्याने तगादा लावल्यानंतर ११ एप्रिल रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. पडताळणी दरम्यान निकुंभ याने ५० हजारांची लाच मागून २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवत्यानंतर सापळा रचण्यात आला. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी आरोपी हवालदार रवींद्र सोनार यांनी २० हजारांची लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर प्रकरणात आरोपी निकुंभचा सहभाग आढळल्याने त्यास शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. दोघा लाचखोरांविरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे -वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, चालक हवालदार रवींद्र घुगे, हवालदार जनार्दन चौधरी, हवालदार सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला