Dhule Crime : वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी झाल्याची बतावणी करीत वरिष्ठांसोबत सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली ३० हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या धुळ्यातील खाजगी तंत्रज्ञ मुकुंद लक्ष्मण दरवडे (प्लॉट नं. ३६, संत कबीर नगर, देवपूर, धुळे) यास अटक करण्यात आली. या कारवाईने वीज वितरणमधील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, लाच प्रकरणानंतर आता संबंधित विभागातील वरिष्ठांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचीदेखील सखोल चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली रा. खांडवी, हवालदार राजन कदम, कॉन्स्टेबल प्रशांत बागुल आर्दीच्या पथकाने यशस्वी केला.
असे आहे लाच प्रकरण
६४ वर्षीय तक्रारदार यांचे धुळ्यातील देवपूर भागात जैस्वाल लिकर बार नावाचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात जुनी वीज मीटर सुमारे २० दिवसांपूर्वी वीज कंपनीच्या वतीने मुकुंद दरवडे यांनी बदलवून त्या जागी नवीन मीटर बसवले. त्यानंतर दरखडे याने वेळोवेळी तक्रारदाराच्या दुकानात जात वीज मीटर कार्यालयात जमा केल्याचे सांगून त्यात छेडछाड झाल्याने मोठ्या प्रमाणावर वीज चोरी झाल्याचे सांगितले व वीज कंपनी कार्यालयात आपली ओळख असून सेंटलमेंट करून देतो, त्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील म्हणत तसे न केल्यास ४६ हजारांचा दंड भरावा लागेल, अशी भीती लागली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा स्वण्यात आला. मंगळवार, १५ रोजी मुकुंद दरवडे हा जैस्वाल लिकर बार या दुकानावर आल्यानंतर त्याने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा मोबाईल कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला.