Jalgaon News : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता या विभागावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जन्म-मृत्यू विभागात अधिकारी व कर्मचारी काम करतात, तिथे तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सध्या सुरू असून, या प्रणालीचे नियंत्रण उपायुक्त पंकज गोसावी यांच्याकडे असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या विभागात दाखले वेळेवर न मिळणे, कर्मचाऱ्यांची कमतरता, तसेच नागरिकांच्या वारंवार तक्रारींमुळे गोंधळ निर्माण झाला होता. मध्यंतरी तहसील कार्यालयाकडून आलेल्या प्रस्तावांसंदर्भातही वाद निर्माण झाला होता, ज्याची चौकशी सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांचे जन्म-मृत्यू दाखले वेळेवर आणि तातडीने
मिळावेत, यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाणार आहे.
कर्मचारी जाणीवपूर्वक काम टाळत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. महापालिकेचा हा निर्णय नागरी सुविधांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.