Jalgaon News : जळगाव येथील महापालिकेच्या २०१८ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत काही उमेदवारांनी एकाच अनामत पावतीवर नामनिर्देशन पत्रे सादर केली असल्याचे तर काहींच्या अनामत रकमा पराभूत झाल्याने जप्त करण्याऐवजी परत केल्या आहेत का? याबाबत चौकशीची मागणी सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ७५ उमेदवारांचे नामनिर्देशन ३ ऑगस्ट २०१८ रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले होते, परंतु त्यानंतर अनामत रकमेच्या परतीबाबत काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अनियमिततेच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले
नियम ३९ नुसार अनामत रक्कम, जर ती जप्त झालेली नसेल तर परत करण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात हा नियम पाळण्यात आला का? याबाबत शंका असत्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही उमेदवारांनी एकाच अनामत पावतीवर अनेक नामनिर्देशन पत्रे सादर केल्याचे समजते. जे नियमविरोधी ठरते.
याचा स्पष्ट खुलासा अपेक्षित आहे. एकच जागा किंवा एकाहून अधिक प्रभागांसाठी अनेक नामनिर्देशन पत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांनी अनामत रकमेचा एकापेक्षा अधिक वेळा भरणा केला असल्याचे दिसते. मात्र नियमाप्रमाणे ती रक्कम जप्त न करता अनामत परत करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० ते २२ उमेदवारांना त्यांच्या अनामत रकमा ते पात्र नसताना त्यांना परत करण्यात आल्या असत्याचे नाटेकर यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चौकशी करण्याची आवश्यकता
या संपूर्ण प्रकरणाची शहनिशा करून, दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९७९ अंतर्गत निवडणूक नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिल नाटेकर यांनी केली आहे. तसेच याबाबत संबंधित अर्जदारांनादेखील माहिती देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.