Jalgaon News : ‘मनरेगा’तर्गत जिल्ह्यात ७६५ ग्रामपंचायत स्तरांवर विविध कामे सुरू आहेत. जिल्हाभरात २७हजारांहून अधिक मजुरांची नोंदणी असली, तरी प्रत्यक्षात साडेसहा हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने थेट मजुरांच्या खात्यावर मेहनताना दिला जातो. परिणामी १५-२० वर्षांपूर्वी रोजगार हमी अर्धे तुम्ही, अर्धे आम्हीचा प्रभाव बऱ्याचअंशी कमी झाला असून, दुसरीकडे या योजनेत पारदर्शकता आल्याने मजुरांचा कल वाढला आहे. मात्र, गेल्या बयाच दिवसांपासून मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नसून, सुमारे आठ कोटींवर मजुरी थकल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात १ हजार १९० ग्रामपंचायती असून, २७ हजार ५९६ मजुरांची नोंदणी आहे. सद्यःस्थितीत ७६५ ग्रामपंचायत स्तरावर विविध कामे सुरू असून, २७ हजार ५९६ पैकी केवळ ६ हजार ५७५ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. ग्रामपंचायत स्तरावर कामांची संख्या बरीच दिसत असली, तरी सद्यःस्थितीत साडेसहा हजार मजूर पाहता कामावर येणाऱ्या मजुरांची संख्या मात्र मर्यादित आहे. उर्वरित मजूर नोंदणी असूनही काम नसल्याने बेरोजगार आहेत. ते मजूर अजूनही कामाच्या प्रतीक्षेत आहेत.
मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी सरकारतर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबविली जाते. ग्रामीण भागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, रोजगार हमी योजनेत आता विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. पाणंद रस्ते, फळबाग यांसह अनेक शेती मशागतीची कामेही योजनेमार्फत केली जात आहेत. शेतकऱ्यांच्या विहिरी, घरकुल, नाडेप, गांडूळ शेड, बांधावर वृक्ष लागवड यांसह इतरही कामे या योजनेमार्फत केली जातात. मात्र, जिल्ह्यात कामांची संख्या वाढली नसल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोहयोची कामे होतील, अशी अपेक्षा मजुरांची होती. मात्र, अजून तरी कामांना वेग आला नाही. रोहयो अंतर्गत रस्तेकामांची मागणी अनेक गावांतून आहे. त्याचबरोबर कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करता येऊ शकतात. मात्र, अजून याबाबत चित्र स्पष्ट नसत्याने प्रगती नाही आणि मजुरांच्या हाताला काम नाही, असे बोलले जात आहे.