धुळे : लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर एका संशयिताने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, डिसेंबर २०२२ पासून ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत साक्री रोडवरील एका संशयित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून त्याचा गैरफायदा घेत एका नामंकित खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये अत्याचार केला. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी फरार आहे.
अनोळखी पुरुषाचा आढळला मृतदेह
धुळे : देवपुरातील वीर सावरकर पुतळ्यानजीक दि. १९ रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास एक अनोळखी पुरूष बेशुध्दवस्थेत पोलिसांना आढळून आला. त्यास उपचारार्थ हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ. भैरव वडजे यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतीच्या वादातून एकास मारहाण
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील नवागाव येथे पूनमचंद हरीचंद ठाकरे याला शेतीच्या वादातून ताराचंद मोतीराम ठामरे (५५) व अविनाश ताराचंद ठाकरे (२४) यांनी मारहाण केली. १६ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी पूनमचंद ठाकरे यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ताराचंद ठाकरे व अविनाश ठाकरे या पिता-पुत्राविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाद्यात दोघांना चौघांची मारहाण
नंदुरबार : शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरातील ३४ वर्षीय विवाहितेने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पोलिसात फिर्याद दिली होती. याचा राग आल्याने १८ एप्रिल रोजी खेतिया येथील पतीसह त्याचे कुटुंबीय शहाद्यात आले होते. त्यांनी विवाहितेची आई, माचसा जाकीस कासम पिंजारी व मेहुणा यांना मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी महिलेने शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोन संशयित महिलांसह रियाज मेहमूद पिंजारी (४२), सायरा सालार पिंजारी (३५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.