Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात सोमवारपासून (५ मे) बुधवारपर्यंत (७ मे) सलग तीन दिवसांपासून बेमोसमी वादळी वाऱ्यांसह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. काही भागांत गारपीटही झाली. यात जिल्हाभरात सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसांत सरासरी ४४ टक्के पावसाची नोंद झाली असून, या बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील ३२० गावांमधील सात हजार ७०४ शेतकऱ्यांचे सहा हजार ३९० हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसांत सरासरी ४४.८ टक्के पाऊस झाला आहे. यात भुसावळ ४ (८.९), मुक्ताईनगर ००.५ (७.८), अमळनेर ६.२ (२०६.७), चोपडा ०.१ (१.५), एरंडोल ०.४ (८.०), पारोळा ५.९ (११३.५), चाळीसगाव ३.४ (४०.०), जामनेर २.८ (४२.४), भडगाव ०.४ (८.७), धरणगाव ०.३ (३.०), बोदवड ०.२ (३१.७) असा दोन दिवसांत सरासरी २.६ मिलिमीटरनुसार ४४.८ टक्के पाऊस झाला आहे. या दोन दिवसांत वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पावसामुळे पशुधनासह उन्हाळी रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर तुटून पडत्याने बऱ्याच ठिकाणी पुरवठा खंडित झाला होता.
मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे जळगाव शहरात ७ ते ८ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे तब्बल ८ ते १० तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर वीजपुरवठा खंडित होत होता. एरंडोल तालुक्यात वीज कोसळून चार बकऱ्या, बैल, अशी पशुधनाची हानी झाली. धरणगाव तालुक्यात तीन म्हशींचा मृत्यू झाला, तसेच जळगाव शहरानजीक नशिराबाद येथे घरावरील पत्रे उबले. शिवाय, शेतपिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान
पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तातडीने शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. चाळीसगाव तालुक्यात ६१ गावांमधील एक हजार ३८२ शेतकरी बाधित असून, ७२३ हेक्टरमधील, तर जामनेर तालुक्यातील ६९ गावांमध्ये ४७८ शेतकरी बाधित असून, २३५ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यातील ३५ गावे बाधित असून, ७४६ शेतकऱ्यांचे ५१६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, पाचोरा तालुक्यात १० गावे बाधित आणि ६५ शेतकऱ्यांचे २८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.
जळगाव तालुक्यातील ४४ गावे बाधित असून, तब्बल दोन हजार ८८६ शेतकऱ्यांचे तीन हजार २३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यातील २९ गावांतील ८८४ शेतकरी बाधित असून, ५१९ हेक्टरमधील पिकांचे, तर मुक्ताईनगर तालुक्यातील ३८ गावांतील ५५० शेतकऱ्यांचे ३९५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील १० गावांतील १५८ शेतकऱ्यांचे २२० हेक्टरमधील, बोदवड तालुक्यातील पाच गावांतील ७० शेतकन्यांचे ३५ हेक्टर, तर चोपडा तालुक्यातील १९ गावांमध्ये ४८५ शेतकऱ्यांचे ४८० हेक्टर क्षेत्रांतील शेतपिके, अशी जिल्ह्यातील ३२० गावांमधील सात हजार ७०४ शेतकऱ्यांचे सहा हजार ३९० हेक्टर शेतपिकांचे नुकसानीची नोंद पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
वीज कोसळून तिघे जखमी, २० पशुधनांचा मृत्यू
वादळी पावसात मनुष्यहानी झाली नसली, तरी तीन जण जखमी झाले आहेत. एरंडोल तालुक्यात ५. धरणगाव २. पारोळा २, बोदवड १, चोपडा १. पाचोरा १ आणि चाळीसगाव २, अशा १४ दुधाळ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. धरणगाव व पारोळा तालुक्यात तीन लहान पशुधनांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, शेतीकामात उपयुक्त असलेले एरंडोल तालुक्यात १, बोदवड १, रावेर १ आणि चाळीसगाव ३. अशा सहा पशुधनांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, २९ झोपड्या, १० गोठे, तसेच दोन हजारांपेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात घरांची पडझड
जळगाव तालुक्यात ३५, चाळीसगाव ३. असे ४१ कच्ची घरे यांसह जिल्ह्यात सहा पक्की घरे, ३८० कच्च्या घरांचे अंशतः नुकसान, तर सात पक्क्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.