Jalgaon Crime : शहरातील एम आयडीसी परिसरात फेब्रुवारी महिन्यात एका लग्न समारंभात ८५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (१५ मे) सकाळी १० वाजता गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. अनिल विजय हरताडे (रा. लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी परिसरातील एका लग्न समारंभात पुष्पाबाई जगन्नाथ न्याती (वय ८५) या रात्री ९ वाजेच्या सुमारास एका खोलीत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्याला काहीतरी टोचल्याचे सांगून २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन दिवसांची कोठडी
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.म हेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथकाने सुरू केला होता. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित अनिल हरताडे याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीची माहिती मिळाल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने त्याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे