Jalgaon News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतीकामांना वेग आला आहे. जमिनीचा पोत टिकवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. दरम्यान, रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी शेणखताला प्राधान्य देत असत्याचे चित्र आहे.
शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते, हे खरे असले तरी रासायनिक खताच्या अति वापरामुळे जमिनीची पोत बिघडते आणि पुढे शेतीमधून निघणारे उत्पन्नदेखील समाधान कारण मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पावले पुन्हा नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे वळत आहेत. त्यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखतातूनदेखील चांगली चांगली मागणी वाढली आहे.
शेणखताच्या ट्रॉलीचा भाव ३००० ते ३१०० रुपये शेणखतासाठी मोजावे लागत आहेत. खत भरण्यांची मजुरी ४०० रूपये आहे. दरवर्षी गुढीपाडवा, अक्षय्य तृतिया झाल्यावर शेतकरी नव्याने शेती नागरणे, कपाशी उपटणे, टिलर करणे, रोटर करणे, खत टाकणे, काडी-कचरा वेचणे, खत पसरवणे, बांधावर माती टाकणे, बंधान खोदणे अशा अनेक शेतीच्या कामांना वेग असतो. दिवसेंदिवस रासायनिक खताच्या किमती वाढत आहेत. महागडी खते घेण्यास शेतकरी धजावत नाही. तसेच रासायनिक खताने जमिनीची पोत खराब होते.
त्यामुळे बहुतांश शेतकरी शेणखत टाकण्यास प्राधान्य देत असतात. एकदा शेतात शेण खत टाकले किमान तीन वर्षे शेती चांगले व उत्पन्नात भर पडते व शेणखतामुळे जमीन भुसभुसीत होऊन पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होतो, असा अनेक शेतकयांचा अनुभव आहे. अनेक शेतकरी बाहेरगावाहून व मिळेल त्या ठिकाणाहून शेतीसाठी शेणखत आणतात.
दरवर्षी रासायनिक खतापेक्षा शेणखत चांगले असून, जमिनीत शेणखत टाकले की, दोन-तीन वर्षे जमिनीची पोत चांगली राहाते व उत्पन्नात वाढ होऊन पिकावर रोगराईचे प्रमाण कमी राहाते.
विनोद पाटील, प्रगतशील शेतकरी, अंतुर्ली बुद्रूक
सेंद्रिय कर्ब हा शेतजमिनीचा आत्मा आहे. शेणखतातून जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब वाढवून जमिनीचा पोत सुधारतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यानी शेणखताबरोबरच शेतातील पिकांचे अवशेष न टाकता जमिनीमध्ये मिसळून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी.
दिगंबर तांबे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव
माझ्याकडे बैलजोडी, गाय-वासरू जनावरांच्या शेण खतापासून चांगली मिळकत होते. दोन-तीन वर्षांपासून शेतकरी शेणखताला मोठी मागणी होत आहे. परंतु पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. त्यात काही वेळेस चाऱ्याचे भाव गगनाला भिडतात. यावर्षी चारा मुबलक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची चाराटंचाई समस्या मिटली आहे.
रामेश्वर पाटील, तरुण शेतकरी, भातखंडे बुद्रुक