Jalgaon News : एमआयडीसी पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन लाख रुपये किमतीचे तीन आयफोन आणि वन प्लस मोबाइल हस्तगत केले. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. नशेमन कॉलनी, के.जी.एन. डेअरीजवळ राहणारे तन्वीर मजहर पटेल यांच्या घरात १८ मे रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास चोरी झाली होती.
अज्ञात चोरट्याने घराचा बंद दरवाजा उघडून घरात प्रवेश करत दोन ॲपल कंपनीचे आयफोन आणि एक वन प्लस कंपनीचा मोबाइल असे एकूण दोन लाख रुपये किमतीचे फोन चोरून नेले होते. तन्वीर यांच्या फिर्यादीनुसार, एम आयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने घटनास्थळाजवळील नागरिकांची चौकशी केली, गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्यांना गुन्ह्याच्या वेळी फिर्यादीच्या घराजवळ एक अल्पवयीन मुलगा फिरत असत्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे तपास पथकाने शहरातील वेगवेगळ्या परिसरात शोध घेऊन त्या अल्पवयीन म ताला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले दोन ॲपल कंपनीचे आयफोन आणि एक वन प्लस कंपनीचा मोबाईल असे दोन लाख रुपये किमतीचे सर्व मोबाइल फोन २४ तासांच्या आत हस्तगत करत गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.