जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शेती विकासासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यावर्षी खरीप हंगामासाठी तब्बल जिल्ह्यातील १ लाख २४ हजार शेतकरी सभासदांना ८५० कोटींपेक्षा अधिक पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, यावर्षी कोणताही शेतकरी सभासद कर्जवाटपापासून वंचित राहणार नाही, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशी, मका, बाजरी, उडीद, म ग. सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात. यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीडनाशके तसेच इतर शेतीसामग्री खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची गरज असते. ही गरज लक्षात घेता जिल्हा बँकेने आत्तापर्यंत ८५० कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे.
थेट अन् विकामार्फत कर्ज वितरण
जिल्हा बँकेने गत वर्षापासून थेट जिल्हा बँकेमार्फतही पतपुरवठा करण्याला सुरूवात केली आहे. त्यास जिल्ह्यातील शेतकरी सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाही थेट जिल्हा बँक आणि विका अशा दोन्हीमार्फत शेतकरी सभासदांना कर्जाचे वितरण केले जात आहे. शेतकऱ्यांनी कर्ज मिळवण्यासाठी ७/१२ उतारा, पीक नमुना, आधार कार्ड, बँक पासबुक यासह कर्ज अर्ज सादर करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांची मागील कर्जे थकलेली नाहीत, त्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.