Jalgaon News : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ‘टी आकारा’चे काम रखडले असून गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगरच्या पुलाचा टी.टी. साळुंखे चौकात उतरणाऱ्या आर्मचे काम तांत्रिक मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाकडे निधी शिल्लक नसल्यामुळे पुलाच्या टी आकाराचे काम तांत्रिक मान्यतेच्या प्रतीक्षेत असत्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवाजी नगर रेल्वे पुलाचे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले होते. आधीचा पूल हा ब्रिटिश काळापासून होता. त्यास १०५ वर्षे झाल्यामुळे तो पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम रेंगाळत रेंगाळत ४ ते ५ वर्षे सुरू होते. त्यानंतर एल आकार पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने तो पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला होता.
मात्र, या पुलाचा राहिलेल्या एका आर्मचे काम ठप्प पडले आहे. टी आकाराच्या आराखड्यातील टी.टी. साळुंखे चौकात उतरणाऱ्या आर्मच्या कामास काही परिसरातील अतिक्रमणधारकांकडून विरोध दर्शविण्यात आला होता. त्यामुळे हा विषय काही दिवस रेंगाळत गेला. त्यानंतर शिवाजीनगर भागातील काही सुज्ञ नागरिकांनी पुलाचा तिसरा आर्म मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला, परंतु या कामासाठी लागणारा ८ ते १० कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य सरकार असमर्थ ठरत आहे.
यामुळे शासनाकडून टी आकाराच्या टी.टी. साळुंखे चौकाकडील आर्मला तांत्रिक मान्यता देण्यात येत नसल्याचा आरोप शिवाजीनगर मधील नागरिकांकडून करण्यात आला आहे. ही फाईल नाशिक येथील मुख्य अभियंता औटी यांच्या टेबलवर वर्षभरापासून धूळ खात पडून आहे. दरम्यान शिवाजीनगरमधील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. तसेच विविध संघटना व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन तातडीने काम मार्गी लावण्याचे साकडे घातले आहे.