या वर्षी मे महिन्यात बेमोसमी पाऊस झाला. तसेच मान्सूनपूर्व पावसानेदेखील यासोबतच हजेरी लावली आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याने तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी २७ मे पासून जिल्ह्यात तसेच राज्यात हवामान कोरडे राहील आणि बहुतांश ठिकाणी काही प्रमाणात तापमानात वाढदेखील होईल.
मे महिन्याच्या शेवटी बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी वाणाच्या लागवडीसह धुळ पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि बेमोसमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारणपणे नेहमीप्रमाणे दक्षिणेकडील राज्यात मान्सून १० दिवस आधीच पोचला आहे.
असे असले तरी २७ मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार आहे. त्यामुळे कोकण विभाग वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यात हवामानात बदल दिसून येणार असल्याचे संकेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ मे पासून हवामान कोरडे राहील तसेच काही अंशी तापमानात पुन्हा वाढ देखील होईल. किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज असून मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता फारच कमी आहे.
या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्व तसेच वादळी पाऊस झाला आहे. त्यामुळे मान्सून लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून वर्तविली जात आहे. परंतु २७ मे नंतर मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) धुळ पेरणी आणि बागायती कपाशी वाणाच्या लागवडीची घाई करू नये.
कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जळगाव