मुक्ताईनगर : राज्यातील मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एक संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (६ जून) श्रीक्षेत्र कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरातून प्रस्थान करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. या पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या व हजारो वारकऱ्यांनी सहभाग घेतला असून सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीला संत मुक्ताईची पालखी ही पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.
मुक्ताईनगर ते पंढरपूर दरम्यान या पालखी सोहळ्यात खान्देशासह मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा येथून भाविक दिंड्यांसह सहभागी होत असतात. सोहळ्यातील चांदीचा रथ ओढण्यासाठी बैलजोडीचा मान राजेश प्रकाश पाटील (नाचणखेडा, जि. ब-हाणपूर, म.प्र.) यांना मिळाला. ही मानाची बैलजोडी मुक्ताईनगरात दाखल झाल्यानंतर या बैलजोडीची नाचणखेडा गावातून गुरुवारी मिरवणूक काढण्यात आली.
तसेच यंदाचा अश्वजोडीचा मान संदीप भुसे (आळंदी देवाची) यांना मिळाला. त्यांचे दोन्ही अश्वदेखील मुक्ताईनगरात दाखल झाले. शेलोडीचे धनंजय जगदाळे, मुक्ताई मंदिर ते पंढरपूरपर्यंत साऊंडची सेवा पुरवणार आहेत.
आषाढीनिमित्त राज्यातून निघणाऱ्या संतांच्या सात मानांच्या पालख्यांमध्ये संत मुक्ताईची पालखी हे सर्वात प्रथम पंढरपूरकडे प्रस्थान करते. दरम्यान, आज मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरातून मुक्ताईचा आषाढी वारी पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे या पालखी सोहळ्याला उपस्थित होते. या पालखी सोहळ्यात एकनाथ खडसे यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. या पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या व हजारो वारकऱ्यांनी सहभाग घेतला असून सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीला संत मुक्ताई ची पालखी ही पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.
दरम्यान, ज्ञानोबा माऊली तुकाराम व संत मुक्ताईच्या जयघोषात संपूर्ण मुक्ताईनगर दुमदुमले असून थोड्याच वेळात या पालखी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थिती लावणार आहेत.