राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; तीन एसी डबे जाळून खाक, सुदैवाने प्रवाशांची जीवितहानी टळली…!

---Advertisement---

 

तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या एसी डब्याला रविवारी पहाटे अचानक आग लागल्याची गंभीर घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात घडली. आगीची झळ शेजारच्या आणखी दोन डब्यांपर्यंत पोहोचल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस दिल्लीकडे जात होती. पहाटे सुमारे ५.१५ वाजता पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागातील लुनी रिच्छा आणि विक्रमगढ अलोट स्थानकांदरम्यान बी-१ एसी डब्यातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले.

आगीमुळे बी-१ डब्यासह शेजारचे आणखी दोन डबे प्रभावित झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक कर्मचारी आणि आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

प्रभावित डब्यातील प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आग लागलेला डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला. रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले.

पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हर्षित श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर तात्काळ ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काही प्रवाशांना किरकोळ त्रास जाणवला असला तरी सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

सकाळी सुमारे ९.४८ वाजता राजधानी एक्सप्रेसला डिझेल इंजिनच्या सहाय्याने विक्रमगढ अलोट स्थानकाकडे रवाना करण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून रेल्वेकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---