Jalgaon News : शहरातील नागेश्वर कॉलनीमधील चार वर्षांच्या बालकाला मोकाट कुत्र्याने लचके तोडत्यामुळे बालकाचा जीव गेल्याची घटना रविवारी घडली होती. त्यानंतर जनभावना तीव्र झात्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कुत्र्यांवर निर्बीकरण शस्त्रक्रिया सुरु केल्या आहेत. तीन दिवसात १३ कुत्रे पकडण्यात आले असून त्यापैकी ४ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
जळगाव शहरात गेल्या वर्ष भरापासून कुत्र्यांवरील निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचे काम बंद आहे. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक चौकात व कॉलन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर फिरणे अवघड झाले आहे.
लहान बालकांसह वयोवृध्दांवर मोकाट कुत्र्यांकडून दररोज हल्ले होत आहेत. रविवारी नागेश्वर कॉलनीमधील चार वर्षाच्या बालकाच्या गळ्यालाच कुत्र्यांने लचका तोडत्यामुळे त्या बालकाचा जीव गेला. त्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला असून नागरिकांसह राजकीय पक्षांकडून मनपा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून तातडीने शहरातील आक्रमक कुत्र्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे.
तीन दिवसात महापालिकेकडून दोन संस्थांच्या माध्यमातून १३ कुत्रे पकडण्यात आले. यापैकी चार कुत्र्यांवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या महाबळ रस्त्यांवरील पशुवैद्यकीय रुग्णालयात निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच त्यांच्या देखभालसाठी सदर संस्थेच्या ताब्यात देण्यात आली असून पाच दिवस त्या संस्थेकडून त्या कुत्र्यांची देखभाल करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या कुत्र्यांना पुन्हा जेथून उचलले होते, त्याच ठिकाणी सोडण्यात येणार आहे.