Jalgaon News : मित्रांसोबत पोहण्यासाठी मेहरूण तलावावर गेलेला मोहंमद नदीम शेख (वय २४, रा. ताबांपुरा) हा तरुण शनिवारी (७ जून) पाण्यात बुडाला होता. त्याच्या शोधार्थ रात्री साडेआठ वाजेपर्यंत मोहीम राबविली असता तपास लागला नव्हता. रविवारी (८ जून) सकाळी या तरुणाचा मृतदेह तपासाअंती मिळाला.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. नदीमचा मृतदेह पाहताच अनेकांना गहिवरून आले. कुटुंबातील सदस्यांसह नातेवाइकांचे डोळे पाणावले. रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. शनिवारी दुपारी नदीम मित्रांसोबत मेहरूण तलावावर पोहण्यासाठी गेला होता. अन्य मित्र तलावात उतरून पोहत होते.
काठावरील नदीम हा त्यानंतर तलावात एकटाच उतरला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी मित्रांनी त्याच्याकडे येण्याचे शर्थचि प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, मनपा अग्निशमन दलातर्फे तलावात नदीमच्या शोधार्य मोहीम राबविण्यात आली.
रात्री साडेआठ वाजता ही शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी सात वाजता शोध मोहीम पुन्हा सुरू केली असता नदीम याचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.