वाराणसी: भेलुपूर भागातील भदैनी पॉवर हाऊसजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका देशी दारू व्यावसायिकाने त्याच्या पत्नीसह तीन मुलांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
राजेंद्र गुप्ता नावाच्या 59 वर्षीय देशी दारू व्यावसायिकाने त्याची 45 वर्षीय पत्नी नीतू गुप्ता, त्याचा 25 वर्षीय मोठा मुलगा नवेंद्र गुप्ता, 15 वर्षांचा लहान मुलगा सुेंद्र गुप्ता आणि 16 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. राजेंद्र गुप्ता यांना एका ज्योतिषाने सांगितले की, त्याची पत्नी त्याच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, त्यामुळे राजेंद्र याने व्यवसायिक यशासाठी पत्नीसह तीन मुलांची हत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच भेलुपूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. त्याचवेळी आरोपी राजेंद्र गुप्ता हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. सध्या पोलीस राजेंद्रचा मोबाईल ट्रेस करून त्याचा शोध घेत आहेत.
शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, राजेंद्र गुप्ता याने यापूर्वीही अनेक खून केले आहेत. यापूर्वी तो लहान भाऊ, आणि वडिलांच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो घरी परतला होता.