नंदुरबार : आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रात राबविलेला ‘सेंट्रल किचन’चा उपक्रम हा अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबविला जात आहे, हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवर झारखंडसारख्या आदिवासीबहुल राज्याची राजधानी रांची येथे राबविण्याचा मानस असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केला आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सेठ यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘सेंट्रल किचन’ला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा नियोजन अधिकारी अंकुश काळे आदी उपस्थित होते.
या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सेठ यांनी महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाने राबविलेल्या नंदुरबार येथील ‘सेंट्रल किचन’ योजनेबाबत प्रत्यक्ष भेट देऊन माहिती करून घेतली.
एकाच स्वयंपाकघरातून शिजलेले स्वच्छ, आरोग्यदायी, पौष्टिक व उल्लेखनीय म्हणजे कडधान्येयुक्त अन्न हे आदिवासी आश्रमशाळांमधील सुमारे 18 हजार विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे व रात्रीच्या जेवणात उपलब्ध करून दिले जाते आहे. आदिवासी मुलांमधील पोषण आहाराच्या समस्येवर परिणामकारक व परिपूर्ण अशी ही ‘सेंट्रल किचन’ची संकल्पना आहे. शिजवलेले अन्न अगोदर ज्यांनी तयार केले आहे, ते अगोदर चाखतात. त्यामुळे त्या अन्नातील अत्यावश्यक घटक व पौष्टिकता तसेच प्रमाणबद्धता एकप्रकारे प्रमाणीत केली जाते. त्यामुळे सकस आहारासाठीची मिड डे मिल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्याच्या निकषांवर आधारित त्रिसूत्री येथे प्रत्यक्षात यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सेठ यांनी सांगितले.
मंत्री सेठ यांनी घेतला सकस आहाराचा आस्वाद
या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सेठ यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत संपूर्ण ‘सेंट्रल किचन’ची कार्यपद्धती जाणून घेतली. उपलब्ध यंत्रसामग्रीचा उपयोग करताना त्यातील अन्नधान्य व भाजीपाला यांची पौष्टिकता कशी जपली जाते, याबाबतचे बारकावेही त्यांनी जाणून घेतले. ‘सेंट्रल किचन’साठी काम करणाऱ्या अधिकारी ल कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत तेथे तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचा आस्वादही घेतला. याप्रसंगी ‘सेंट्रल किचन’चे व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांसह विविध संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
नंदुरबारच्या धर्तीवर रांचीत ‘सेंट्रल किचन’ निर्माण करणार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांचा मानस