---Advertisement---
माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्यातील बेहडाला गावात एका लहान मुलीला केवळ पेरू तोडल्याच्या कारणावरून निर्दयी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक चिमुकली रस्त्याने जात असताना घराच्या अंगणातील पेरूच्या झाडाची फांदी रस्त्यावर आली होती. त्या फांदीवरील पेरू तिने तोडल्याचा राग मनात धरून घरमालक असलेल्या एका माजी सैनिकाने तिला पकडले. त्याने मुलीला घरात नेऊन तिचे हात-पाय दोरीने बांधले आणि बेदम मारहाण केली.
या दरम्यान मुलगी “अंकल वाचवा, सोडून द्या…” अशी आर्त विनवणी करत होती. मात्र आरोपीने तिच्यावर दया न दाखवता क्रूरपणे मारहाण सुरूच ठेवली. काही स्थानिकांनी हा प्रकार पाहून तात्काळ हस्तक्षेप केला आणि मुलीची सुटका केली.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि जुवेनाईल जस्टिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, “एवढ्याशा कारणासाठी मुलीवर अशी अमानुष वागणूक देणे अत्यंत निंदनीय आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. अल्पवयीन मुलांशी अशा प्रकारे वागणे हे केवळ कायद्याविरुद्धच नाही, तर मानवी संवेदनांनाही काळिमा फासणारे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.









