---Advertisement---
क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय ‘स्मृती कलश यात्रा’ आज धरणगाव येथून भक्तिभावाने सुरू झाली. धरणगाव, चोपडा आणि शिरपूर या तालुक्यांमधून मार्गक्रमण करत ही यात्रा ११ एप्रिल रोजी आंबापाणी येथे समारोप होणार आहे.
या यात्रेत तीन आकर्षक चित्ररथ सहभागी असून, सुमारे २० कार्यकर्ते आणि भजनी मंडळाचा सहभाग आहे. धार्मिक वातावरणात निघालेल्या या यात्रेमुळे गावागावांत एकात्मतेचा संदेश दिला जात असून, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी पूजन, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.
९ एप्रिल रोजी धरणगाव तालुक्यातील स्मृती मंदिरासह हिंगोणे बु. व हिंगोणे खु., पिंप्री, हनुमंतखेडे, सोनवद, बाभूळगाव, अहिरे, भामर्डी आणि खर्दे या गावांमधून यात्रा पार पडली. या टप्प्यानंतर नांदेड येथे मुक्काम करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत यात्रेचे स्वागत केले.
१० एप्रिल रोजी यात्रा चोपडा तालुक्यात प्रवेश करत चहार्डी, मालापूर, बोरअजंटी, वैजापूर, शेनपाणी, खाऱ्यापाडा, गौऱ्यापाडा, उमरटी आणि मोरचिडा या गावांमधून पुढे जात आहे. या दिवशी सत्रासेन येथे मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी भजन, कीर्तन आणि प्रार्थना सत्रांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे.
११ एप्रिल रोजी यात्रा शिरपूर तालुक्यातील खामखेडा, आंबा, खंबाळा, जायदा, सांगवी, पळासनेर आणि बारवापाडा या गावांतून जात आंबापानी येथे समाप्त होणार आहे. अंतिम टप्प्यात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या स्मृती कलश यात्रेचा उद्देश जनजाती समाजात जागृती निर्माण करणे हा आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या जनजाती क्रांतिकारकांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे, तसेच खाज्याजी नाईक यांच्या योगदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत जावी, यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
धरणगाव येथील त्यांच्या ‘शीर’ असलेल्या स्मृतीस्थळापासून ते आंबापानी येथील ‘धड’ असलेल्या स्मृतीस्थळापर्यंतचा हा प्रवास जनजाती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या यात्रेत क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्थेचे अध्यक्ष भाईदासजी सोनवणे, संचालक सोमनाथ भिल, समीर शिंदे, संजय महाराज, पिंटूभाऊ पावरा, जामलाल महाराज, दत्ता पावरा, सोनू भादले, प्रवीण पवार यांच्यासह जनजाती समाजातील अनेक कार्यकर्ते आणि वाटवा पाडा येथील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.









