Check Bounce : चेक देताय काळजी घ्या! धनादेश न वटल्याने एकास तब्बल ४१ लाखांचा दंड

जळगाव :  धनादेश न वटल्याने न्यायालयाने एकास व्याज, दंडासह ४१ लाख रुपये याचिकाकर्त्याला अदा करण्याचे आदेश दिले आहेत. रक्कम अदा न केल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. बऱ्हाणपूर न्यायालयाने हा आदेश दिला. हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी धनादेश  दिला होता. संजय नारायण देशमुख (वरणगाव ता. भुसावळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

गजानन जगन्नाथ महाजन (वय ५८ रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश ) यांचे भुसावळ तालुक्यातील येथील संजय नारायण देशमुख यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत.  आर्थिक अडचण असल्याने देशमुख यांनी गजानन जगन्नाथ महाजन यांच्याकडून ३० लाख रुपये हातउसने स्वरूपात घेतले.

संबंधातून संजय देशमुख याने महाजन यांच्याकडून ३० लाख रुपये हात उसनवारीने घेतले होते. ते वेळेत परत करेल, असे आश्‍वासनही त्याने दिले. रकमेच्या परतफेडीसाठी देशमुखने महाजन यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी शाखेचा ३० लाखांचा धनादेश दिला.  महाजन यांनी धनादेश वटविण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या बऱ्हाणपूर  शाखेत जमा केला.

परंतु, संजय देशमुख यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश वटला नाही. महाजन यांनी त्यानंतर रकमेसाठी देशमुखांकडे तगादा लावला. मात्र, रक्कम मिळाली नाही, म्हणून महाजन यांनी बऱ्हाणपूर न्यायालयात चेक बाऊन्सची याचिका दाखल केली.

त्यात बऱ्हाणपूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश गुरुवेंद्र कुमार हुरवाडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात देशमुख यांच्यावर दोष सिद्ध होऊन त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. या रकमेपोटी व त्यावरील व्याज, दंड व अन्य रक्कम, अशी एकूण ४१ लाख ७४ हजार ४६० रुपये महाजन यांना अदा करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.