---Advertisement---
दीपक महाले
जळगाव : महापालिका निवडणुकीची आता राजकीय तयारी जोरात सुरू झाली असून, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटांनी तयारीत आघाडी घेतली आहे. गत निवडणुकीपेक्षा आताच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहे. गेल्या निवडणुकीत 615 उमेदवारी अर्ज दाखल होते. यंदा सर्व राजकीय व अपक्ष मिळून अडीच हजारांवर इच्छुकांकडून तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर बंडखोरीचे आव्हान उभे आहे.
शहरात आता तब्बल सात वर्षांनंतर होत असलेल्या महापालिकेचा निवडणूक रणसंग्राम सुरू झाला असून, राजकीय पक्षांनी आता प्रत्यक्ष मैदानात कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी प्रशासनापाठोपाठ राजकीय तयारीलाही वेग आला आहे. एकीकडे वरिष्ठ स्तरावरून महायुती व महाविकास आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू असताना, स्थानिक पातळीवर बिघाडी झाल्याचे चित्र आहे. भाजपसह दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसने ‘एकला चलो’चा नारा देत महापालिकेच्या सर्वच्या सर्व 75 जागांची तयारी सुरू केली आहे. भाजपने तयारीत आघाडी घेतली आहे. भाजपकडून वर्षभरापासून 75 जागा लढण्याच्या तयारी करण्यात आली आहे.
सर्वच राजकीय पक्षांकडून मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण अन् रणनीती ठरली
महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गटाकडून मुलाखतींची प्रक्रिया जसे अर्ज प्राप्त होत आहेत, तशा मुलाखती घेतल्या जात आहेत. काँग्रेसकडूनही निवडणूक तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेसकडे वंचित बहुजन आघाडीसह समविचार पक्षांकडून प्रस्ताव आले आहेत. भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या मुलाखत प्रक्रियेवेळी शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादीचेही चेहरे मुलाखतीसाठी उपस्थित असल्याचे दिसून आले. भाजपकडून इच्छुकांना मुलाखत प्रक्रियेत प्रश्नावली देण्यात आली होती. त्यात 26 प्रश्न होते. या प्रश्नावलीने इच्छुकांना चांगलाच घाम फोडल्याचे दिसून आले. भाजपतर्फे जी. एम. फाउंडेशनच्या कार्यालयात वस्त्रोद्योगमंत्री तथा निवडणूक प्रभारी संजय सावकारे यांच्या उपस्थितीत, शहराचे निवडणूकप्रमुख आमदार सुरेश भोळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, महानगर-जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, निवडणूक संयोजक विशाल त्रिपाठी आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेले काही दिग्गज नेतेही या प्रक्रियेत सहभागी दिसून आले. त्यामुळे पक्षातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते व नव्याने प्रवेश केलेले इच्छुक यांच्यात समन्वय साधण्याची ‘कसोटी’ भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर असेल. शिवसेना शिंदे गटातर्फे केमिस्ट भवनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, श्याम कोगटा, महिला आघाडी संपर्कप्रमुख सरिता कोल्हे-माळी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, महानगरप्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, युवासेना विस्तारक किशोर भोसले यांनी मुलाखत प्रक्रिया पार पाडली. तत्पूर्वी, धर्मवीर आनंद दिघे नगरी सहाय्यता कक्षांतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून विजयापर्यंतची निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देत, प्रभागनिहाय प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली.
सर्व राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या भाऊगर्दीत अपक्षांचीही तयारी
महापालिकेच्या ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 75 जागांसाठी तब्बल 615 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत तब्बल 188 अर्ज बाद ठरून 427 उमेदवारांनी नशीब आजमावले होते. अपक्ष म्हणून तब्बल 200 उमेदवार होते. तत्कालीन भाजप-शिवसेना युतीत भाऊगर्दी होती. त्यातही उमेदवारी नाकारल्याने अनेक जण अपक्ष म्हणून लढले. ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमी (एमआयएम)कडूनही सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आता तब्बल सात वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी गत निवडणुकीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक इच्छुक लढण्यासाठी तयारीत आहेत. भाजपकडे इच्छुकांचे 550, तर शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांचे 350 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 200 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 150 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेही 207 अर्ज, तर काँग्रेसकडे 40 ते 45 अर्ज प्राप्त झाले आहेत. शहरातील 19 प्रभागांतूनही वॉडनिहाय अपक्ष म्हणूनही 500 वर इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या 75 जागांसाठीची निवडणूक लढण्यासाठी अडीच हजारांवर इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तळातून वर्तविली जात आहे.
पक्षनेत्यांकडे मुलाखत प्रक्रियेतील इच्छुकांची उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’
शहरात महापालिका निवडणुकीचे वातावरण वर्षभरापासूनच तापले असून, प्रभागनिहाय मुलाखतींमध्ये माजी नगरसेवकांसह अनुभवी कार्यकर्ते-पदाधिकारी, तरुण, उद्योजक, डॉक्टर, अभियंते, वकील यांचा समावेश असल्याचे दिसून आले. त्यातही महिलांचीही संख्या लक्षणीय आहे. काहींकडून कुटुंबातील महिलांसाठी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे इच्छुकांची गर्दी दिसून येत असून, प्रत्येक इच्छुक आपापल्या नेत्याकडे धाव घेत उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी पाहता, शहरात मंडळनिहाय इच्छुकांना आपापल्या भागांतील मतदारांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यासह विकासकामांची, लाभाच्या योजनांची माहिती पोहोचविण्याच्या सूचना नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत. शिवाय, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील लाडकी बहीण योजनेसह विविध विकासकामांची जंत्री मतदारांपर्यंत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पक्षाकडे इच्छुकांचा वाढता कल आहे. महापालिकेच्या सर्वच 75 जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. उमेदवारीसाठी तब्बल 180 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सद्यःस्थितीत इच्छुकांच्या अर्जांची छाननी केली जात असून, सक्षम उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. महापौर आमचाच होईल.
- संजय पवार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, जळगाव)
पक्षाकडे इच्छुकांचे दीडशेवर अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुकांकडून रोजच अर्ज प्राप्त होत आहेत. त्यामुळे मुलाखत प्रक्रिया राबविली जात आहे. प्रत्येक वॉर्डासाठी तीन ते चार इच्छुकांचे अर्ज आले आहेत. दोन-चार दिवसांत उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात नावे जाहीर केली जातील.
- एजाज मलिक (महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, जळगाव)
पक्षाकडे इच्छुकांचे 207 अर्ज प्राप्त झाले आहेत. दोन दिवस पक्षाकडून मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. पक्षाकडून सर्व 75 जागांवर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डातून पाच ते सात जण लढण्यासाठी इच्छुक असून, सद्यःस्थितीत अर्जांची छाननी आणि सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. 2018 च्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इच्छुकांचा विचार सुरू असून, सक्षम उमेदवारच निवडणुकीत दिला जाणार आहे. महापौर आमच्याच पक्षाचा होईल.
- कुलभूषण पाटील (जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जळगाव)
पक्षाकडे इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत साडेतीनशेपेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून, दोन दिवस मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. महापालिकेच्या सर्व 75 जागा लढण्याची तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरासह परिसरात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. महापालिकेवर भगवाच फडकेल.
- विष्णू भंगाळे (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट, जळगाव)
पक्षाकडून इच्छुकांना 60 ते 65 अर्ज वितरण करण्यात आले होते. त्यातील 40 ते 45 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षाकडे वंचित बहुजन आघाडीसह समविचारी इतर पक्षांकडूनही युतीबाबत प्रस्ताव आले आहेत. समविचारी पक्षांना सोबत घेऊन महापालिका निवडणुकीची तयारी केली आहे. जनसेवेसाठी निवडणूक लढविली जात आहे. इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया राबविण्यात आली असून, सक्षम उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत उमेदवारांबाबत अंतिम निर्णय होईल. वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवार जाहीर केले जातील.
- श्याम तायडे (महानगराध्यक्ष, काँग्रेस, जळगाव)
महापालिकेच्या सात वर्षापूर्वीच्या निवडणुकीची स्थिती
ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने अगोदर युतीचा प्रयत्न केला. शहराच्या इतिहासात डोकावले असता, गेली 40 वर्षे सुरेशदादा जैन गटाकडेच महापालिकेतील सत्तेची चावी अखंडपणे होती. या सत्तेला आजपर्यंत कुणीही धक्का लावू शकले नव्हते. जिल्ह्यातील राजकीय अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा विकास मात्र झाला नव्हता. विविध आरोप आणि घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेले सुरेशदादा जैन यांना राज्यकारभार महापालिकेत सुरळीत चालण्यासाठी सरकारचे पाठबळ हवे होते. त्यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीचा प्रस्ताव तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीमधून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासमोर ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दाखवली होती. मात्र, आमदार सुरेश भोळे आणि कार्यकर्त्यांचा विरोध समोर आल्याने या युतीला मूर्त स्वरूप येऊ शकले नव्हते, अशीही चर्चा त्या वेळी रंगली होती. मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे गिरीश महाजन आणि सुरेशदादा जैन दोन्ही नेते युती करण्यासाठी प्रयत्नरत होते. युतीसाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे महाजन यांनी मात्र विविध पक्षांतील इच्छुकांना आपल्या गोटात सहभागी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. महाजन यांच्या या प्रयत्नास अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले होते. त्या वेळी मनसेच्या महापौरांसह 12 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाल्याने भाजपची ताकद वाढली होती. भाजपकडून सर्वच्या सर्व 75 जागा, तर शिवसेनेकडून 70 जागा लढविण्यात आल्या होत्या. अगोदरच्या निवडणुकीत केवळ 15 जागा मिळविणाऱ्या भाजपला 2018 च्या निवडणुकीत बहुमताने विजयी होण्याचा विश्वास वाटू लागला. एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची चिन्हे असताना त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक एकत्रित लढली. काँग्रेसला आजपर्यंत जळगाव महापालिकेत एकही जागा मिळविता आलेली नव्हती. राष्ट्रवादी 43, तर काँग्रेसने 16 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, गेली 40 वर्षे अखंड सत्ता असलेले सुरेशदादा जैन यांच्या शिवसेनेला महाजन यांनी शह देऊन 57 जागांवर विजय मिळविला. मात्र, त्यानंतर यातील 27 सदस्यांनी वेगळी चूल मांडत शिवसेनेच्या मदतीने मार्च 2022 मध्ये सत्तांतर घडवून आणले होते. यानंतर भाजपने या सदस्यांना अपात्र करावे, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. यात उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांनी यावर निर्णय द्यावा, असे निर्देश दिले होते. विभागीय आयुक्तांकडे यावरील सुनावणी ही शेवटच्या टप्प्यात पोहोचली असतानाच महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात उच्च न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे गट निर्माण झाले. त्यातील सात नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. महापालिकेचे राजकारण संभ्रमावस्थेत होते. नेमके कोण कोणत्या गटासोबत याबाबत अधिकारीही चक्रावले होते. निधीसह होणाऱ्या राजकीय अडचणीअभावी नगरसेवक या ना त्या गटात बंडखोरी करीत प्रवेश करीतच होते. महापालिकेचे राजकारण अस्थिर झाल्यामुळे शहराच्या विकासालाही बाधा झाली होती. त्यानंतर भाजप- शिवसेना शिंदे गटाची राज्यात सत्ता आल्यानंतर काही प्रमाणात विकासकामांना गती आली.
आतापासूनच विजयाचे दावे-प्रतिदावे
ऐन हिवाळ्यात महापालिका निवडणुकीचे वातावरण तापले असून, राज्यात सत्तेतील महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर बेबनाव निर्माण झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांतर्फे निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या अधिक झाली असून, पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच कसोटी लागली आहे. भाजपकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून, तर इतर पक्षांकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ऑगस्ट 2018 मधील महापालिका निवडणुकीत दुसऱ्या स्थानी आणि कमी मतांनी पराभूत उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. भाजप, दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिकेवर विजयाचा दावा करण्यात आला आहे. मात्र, जळगावकर नववर्षात महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो, हे 16 जानेवारीला पाहणे औत्सुक्याचे राहील.









