जळगाव : एमआयडीसीतील डी ६६ येथील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला रविवारी रात्री ११.१५ वाजता आग लागली. कंपनीत चटईचा तयार माल व कच्च्या मालाचा प्रचंड साठा असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, कंपनीतील कुलरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे कामगारांनी सांगितले. सुदैवाने आगीत कुणीही जखमी झालेला नाही. आग विझवण्यासाठी जळगावसह भुसावळ, वरणगाव, दीपनगर, चाळीगाव अशा विविध ठिकाणचे आठ ते दहा अग्निशमन बंब मागवण्यात आले आहे.
विवारी रात्रीच्या तिसऱ्या शिफ्टसाठी कामावर आलेले दहा ते पंधरा कामगार आग लागल्यानंतर बाहेर निघाले. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे घटनास्थळी दाखल झाले होते.
कंपनीत तयार चटई आणि प्लास्टिक दाणे कच्चा माल असल्याने आग लागलीच पसरली. काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे की कंपनीत एक गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला. या दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लक्ष ठेवून होते.
या आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे आणि कंपनीच्या कार्यालयीन कागदपत्रे आणि संपूर्ण उत्पादन सुविधा नष्ट झाली आहेत. आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अधिकारी चौकशी सुरू ठेवणार आहेत. या घटनेमुळे कंपनी आणि त्यात काम करणार्या कर्मचार्यांवर मोठा परिणाम होणार आहे.